पंकज राऊत, बोईसरतारापूर अणुउर्जा केंद्र, भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) तारापूर एमआयडीसी सह बोईसर, चिंचणी, तारापूर ते डहाणू खाडीपर्यंत सुमारे पन्नास गाव-पाड्यांना जोडणाऱ्या तारापूर बोईसर मुख्य रस्त्यावरील पास्थळ-परताळी दरम्यानचा बाणगंगा नदीवरील नवीन पूल तयार असूनही काही झाडांची तोड व डांबरीकरण बाकी असल्यामुळे ब्रिटीशकालीन जुन्या व अत्यंत धोकादायक पुलावरून अहोरात्र वाहतूक सुरू ठेऊन प्रशासन प्रवासी, वाहनचालक यांचे जीव धोक्यात घालते आहे. सावित्रीवरील पुलासारखी मोठी भीषण दुर्घटना घडल्यानंतरच नवीन पुलाचा वापर सुरू करणार का? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.ब्रिटीशांच्या काळात बांधण्यात आलेल्या बाणगंगेवरील दगडी पूलाचे आयुष्यमान कधीच संपले असून आवश्यकतेनुसार तात्पुरती डागडुजी करून आजही त्याचा दिवसरात्र वापर सुरू आहे. हाजारो वाहनांची वाहतूक सुरू असलेल्या या पुलाखालील सिमेंटचे काँक्रीट उखडून लोखंडी गंजलेल्या सळया लोंबकळत आहेत तर पुलाचा कठडा खिळखिळा व धोकादायक असून वाहनाच्या धक्क्यानेही तो तुटण्याच्या स्थितीत आहे. पुलाचे मुख्य पिलर्स व गर्डर तडे जाऊन खिळखिळे झाले आहेत. त्यामुळे भीषण दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पुराच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे पूल कोसळून जीवीतहानी होण्याची शक्यता आहे. सध्या या जुन्या पुलावरून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून अणुऊर्जा केंद्राला वीजनिर्मिती करीता लागणारे युरेनियम प्रचंड अवजड वाहनातून आणण्यात येते. २००२ साली याच पुलावरून पूराचे पाणी पाच ते सहा फूट उंचावरून वाहत होते त्या पुरामध्ये पाच जणांचा बळीही गेला होता. विशेष गंभीर बाब म्हणजे या जुन्या पुलावर व पुलाच्या मुखाच्या रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले असून ते खड्डेही अपघाताला निमंत्रण देऊ शकतात.एनपीबीआयएल ने पूल उभारण्याकरीता संपूर्ण निधी सा. बा. खाते याना दिला असताना तसेच त्याचे भूमिपूजन माजी आदिवासी विकास मंत्री राजेंद्र गावितांनी २७ डिसेंबर २०१२ रोजी केले त्या नंतर वेगवेगळया तांत्रिक अडचणी सा.बा. खाते व अणुऊर्जा प्रशासनाकडून निर्माण झाल्या दोन्ही मधल्या समन्वयाचा अभाव लालफितीचा गोंधळ, सध्याच पुलाजवळून गेलेल्या ३३ के. व्ही. क्षमतेच्या विद्युत वाहिनीच्या स्थलांतरास झालेला विलंब इ. अनेक कारणामुळे नवीन पूलाचे बांधकाम खोळंबले होते. दरम्यान पूल बांधणीचा खर्च रू. १८ लाख ३६ हजाराने वाढला होता त्या वाढीव खर्चाला नविन पूल बांधण्याच्या वेळी मान्यता मिळाली नव्हती तेव्हा २०१२-१३ च्या टेंडर नुसारच हे काम करण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते तर नवीन बांधण्यात आलेल्या पूलाच बांधकामाच्या दर्जाबाबत तसेच त्या पुलाच्या क्षमतेच्या तपासणीसाठी अणुऊर्जा खात्याने सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र दिल्याचेही समजते. हा पूल कधी खुला होणार ते सां.बा.ने स्पष्ट करावे, अशी मागणी जनतेकडून होते आहे.ब्रिटीशकाली बाणगंगा पूलाचे खालील स्ट्रक्चर पूर्ण दगडाचे असून काही ठिकाणी त्या बांधकामाला तडे गेले आहेत. पुलाच्या रस्त्याखालील स्लॅबच्या भागातील सिमेंट काँक्रीट उखडून गंजलेल्या अवस्थेतील सळयांची जाळी दिसत आहे. अणुकेंद्रात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आणि त्याच दरम्यान पुलाला धोका निर्माण झाल्यास गोंधळाची शक्यता आहे कारण नविन बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूने झाड आहेत ती हटविल्याशिवाय तेथून परिपूर्ण वाहतूक होऊ शकत नाही तसेच या पूलाचे गांभीर्य लोकमतने अनेक वेळा निदर्शनास आणून दिलेले आहे. काही सळया लोंबकळत आहेत पुलाखाली वाहत आलेले मोठे दगड नेमके पुलाच्या कुठल्या भागातील आहेत ते नदीपात्र भरल्याने समजत नसले तरी पुलाचा कठडा अत्यंत धोकादायक स्थितीत आहे.
ब्रिटीशकालीन धोकादायक पुलावरून वाहतूक
By admin | Updated: August 11, 2016 03:50 IST