नवी मुंबई : ढोल - ताशांचा नाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात मंगळवारी दीड दिवसाच्या गणरायास भक्तिभावाने निरोप देण्यात आला. शहरातील विसर्जन तलावांवर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत बाप्पाला निरोप देण्यात येत होता.
मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांना अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पाची सेवा करता येत नाही. यामुळे दीड दिवसाचे पूजन करून बाप्पाला निरोप दिला जातो. नवी मुंबई परिसरातील २३ विसर्जन स्थळांवर जवळपास ८५९७ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. घरगुती गणरायाबरोबरच, रिक्षा चालक-मालक संघटना, सार्वजनिक मंडळातील बाप्पांना यावेळी निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर सर्वत्र ऐकू येत होता. रात्री उशिरापर्यंत तलावांवर भाविक उपस्थित होते. महापालिका प्रशासनाने तलावांवर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तलाव परिसरात निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहे. विसर्जन स्थळांवर पोलीस तैनात असून भाविकांच्या सुरक्षेकडे काटेकोरपणे लक्ष देण्यात आले.
शहरातील मुख्य १४ तलावांमध्ये इटालियन गॅबियन वॉल पद्धतीच्या रचनेद्वारे निर्माण केलेल्या विशिष्ट जागेत भाविक भक्तांनी व मंडळांनी श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करून पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महापालिकेस अनमोल सहकार्य दिले. सर्व विसर्जनस्थळांवर श्रीमूर्ती विसर्जनाकरिता तराफ्यांची व आवश्यक त्या ठिकाणी फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काठावर बांबूचे बॅरेकेटिंगही करण्यात आले होते. भाविकांना पिण्यासाठी पाणी तसेच वैद्यकीय पथकाचीही सोय याठिकाणी करण्यात आली होती.
पोलीस प्रशासनाच्या वतीनेही विसर्जन तलाव व परिसरामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. भाविकांनी विशेषत: महिलांनी दागिने, लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत होते. खारघर, कळंबोली, पनवेल, उरण परिसरामध्येही गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. २३ विसर्जन स्थळांवर संबंधित विभागाचे विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली श्रीमूर्ती विसर्जन योग्य रीतीने होण्याकरिता स्वयंसेवक, लाइफगार्ड्स तैनात होते. प्रत्येक विसर्जनस्थळावर पुरेशा विद्युतव्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मलेरिया / डेंग्यू नियंत्रणाबाबत जनजागृती विसर्जन स्थळांठिकाणी करण्यात आली.