नवी मुंबई : नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यावर निर्बंध असतानाही शहरात ठिकठिकाणी या नियमाचे उल्लंघन करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे पाहायला मिळते. दुकारदार, व्यावसायिकांबरोबरच फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या पाहायला मिळत असून, या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर फक्त नावापुरतीच कारवाई होत असल्याने यावर अजूनही गांभीर्याने लक्ष घातले जात नसल्याचे चिन्ह दिसून येते. प्लास्टिक पिशव्यांच्या वापराचा मानवी आरोग्य तसेच पर्यावरणावर घातक परिणाम होत असून, या पातळ पिशव्यांचे नैसर्गिकरीत्या विघटन होत नसल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. या पिशव्या सांडपाण्याचे नाले, गटारांमध्ये अडकून राहिल्याने पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. व्यावसायिक, दुकानदार, कारखानदार, फेरीवाल्यांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दंड वसूल केला जातो. परंतु महानगरपालिका क्षेत्रात या पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर ठोस उपाययोजना न राबविल्याने या पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे पाहायला मिळते. सीबीडी, नेरूळ, सानपाडा, वाशी, तुर्भे, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणेतील फेरीवाले, चायनीज विक्रेते, किरकोळ व्यापारी, मटण विक्रेते ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर करीत आहेत. (प्रतिनिधी)
दुकानांत पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्या
By admin | Updated: December 12, 2015 00:50 IST