नवी मुंबई : झपाट्याने विकास होणारे शहर अशी ओळख असलेल्या पनवेल शहरातील महिला साक्षरतेचे प्रमाण मात्र कमी असल्याचे पहायला मिळते. तालुकानिहाय महिला साक्षरतेचे प्रमाण पाहिले असता एकूण ८५.८९ टक्के महिला सुशिक्षित असून उरलेल्या १४.११ टक्के महिलांनी काही कारणास्तव प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याचे पहायला मिळते.१९७९ सालापासून पनवेल नगरपरिषदेच्या वतीने मोफत प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. १९२९ साली प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी कोलाबा जिल्हा शिक्षण बोर्डाकडे सोपविण्यात आली. नगरपरिषदेच्या वतीने पनवेलमधील सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालयांना १० हजार रुपये अनुदान देण्यात येत असून महिला साक्षरतेचे प्रमाण पाहिले असता या सर्वच योजना कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसून येते.विभागनिहाय साक्षरतेचा अभ्यास केला असता पनवेल नगरपालिका क्षेत्रात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक असून पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण(टक्केवारीमध्ये) ९५.९७ टक्के असून महिला साक्षरतेचे प्रमाण ९१.७१ टक्के असून यामध्ये चांगलीच तफावत पहायला मिळते. साक्षरतेचे सर्वात कमी प्रमाण असलेल्या वडघर तालुक्यात एकूण साक्षरतेचे प्रमाण ८१.११ तर पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण ८७.६१ टक्के आहे आणि ७३.८७ महिला साक्षर आहेत. पनवेल नगरपालिका, सिडको कार्यक्षेत्र, खारघर, तळोजा पाचनंद, पालीदेवद, वडघर, काळुंद्रे, ओवळे या सर्व विभागांमध्ये साक्षरतेचे एकूण प्रमाण ८८.७४ टक्के इतके आहे. पनवेलमधील लोकसंख्येनुसार ८०,४९३ नागरिक साक्षर असून, ४४ हजार ४३३ पुरुष तर ३६ हजार ०६० महिला साक्षर आहेत, २३ हजार ५९५ नागरिक अशिक्षित आहेत. यामध्ये १० हजार ५३० पुरुष तर १३ हजार ३५ महिलांचा समावेश आहे. पनवेल तालुक्यामधील गावांमध्ये अजूनही मुलींना शिकविले जात नसून गावागावात अजूनही स्त्रीशिक्षणाचा प्रचार व प्रसार पुरेसा झालेला नाही.
पनवेलमधील महिला साक्षरतेचे प्रमाण कमीच 85.89 %
By admin | Updated: March 8, 2016 02:11 IST