उरण : शहरातील कामोठा रस्त्यालगतच्या घरावर बुधवारी सकाळी १०.३० वा. सुमारास झाड कोसळले. कौलारू घरावर पडलेल्या झाडामुळे घराचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने वृद्ध जोडपे थोडक्यात बचावले आहे. या प्रकरणी उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.नौदलात काम करून सेवानिवृत्त झालेले सुधीर म्हात्रे (६८)आपल्या पत्नीसह उरण कामोठा रस्त्याला लागून असलेल्या घरात राहत आहेत. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला आणि घराशेजारीच असलेले आंब्याचे भले मोठे झाड आकस्मिकपणे घरावरच पडले. याच दरम्यान सुधीर व त्यांच्या वृद्ध पत्नी शीतल (६५) हे जोडपे स्वयंपाक घरात होते. मात्र झाड घरांच्या भिंतीवरच अडकून पडल्याने सुदैवाने ते बचावले. मात्र घरांची कौले आणि इतर बांधकाम तुटून घराचे मोठे नुकसनि झाले आहे. गणपती सणापूर्वी दुरुस्ती होईल काय? या विवंचनेत हे दाम्पत्य आहे. घटनेचे वृत्त समजताच उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आर्थिक नुकसानीचा पंचनामा केल्याची माहितीही गोडे यांनी दिली.
घरावर कोसळले झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:05 IST