पनवेल : खारघर गावातील मच्छिंद्र फडके नावाच्या ग्रामस्थाचा शहरामध्ये जनरेटर सर्व्हिसचा व्यवसाय आहे. जनरेटर भाड्याने देण्याचे काम करणाऱ्या फडकेला बुधवार, २६ आॅक्टोबरला जनरेटर भाड्याने घेण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने खारघर सेक्टर ३५ येथे बोलावून घेतले व अपहरण करून दहा लाखांची खंडणी मागितल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. या प्रकरणात पेठ गावातील जयेंद्र शेळकेचा हात असल्याचे फडके यांनी नोंदविलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. खारघर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. जयेंद्र शेळके या ओवे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याने मच्छिंद्र फडके यांना सेक्टर ३५ जवळील गणेशमंदिरात थांबण्यास सांगितले. त्यानंतर मारुती ब्रिझा (एमएच ४६ एएच १२२२) गाडीतून त्यांना तळोजाच्या दिशेने घेऊन शेळकेने मारहाण करून दहा लाखांची मागणी केली. घाबरलेल्या फडकेने आपल्या मुलाला पाच लाखांची व्यवस्था करण्यास सांगितले. मुलाने अडीच लाखांची व्यवस्था झाल्याचे वडिलांना सांगितल्यानंतर आरोपींनी ते पैसे खारघरमधून एका व्यक्तीकडून घेतले. गाडी पेंधर फाटा याठिकाणी आल्यानंतर आरोपींनी पुन्हा दहा लाखांची मागणी केली. गाडी घोट गावाच्या दिशेने जाताना प्रसंगावधान दाखवून फडकेने गाडीतून उडी घेत सुटका करून घेतली. याप्रकरणी शेळके व तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
अपहरणाचा डाव फसला
By admin | Updated: October 28, 2016 03:54 IST