नामदेव मोरे , नवी मुंबई स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईमध्ये अमली पदार्थ विक्रेत्यांचा धुडगूस सुरूच आहे. लोकमतच्या स्टिंग आॅपरेशननंतर चार अड्डे बंद झाले असले तरी इतर ठिकाणी अद्याप खुलेआम विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे एपीएमसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच अजून चार अड्डे सुरू असून एका ठिकाणी एमडी पावडरचीही विक्री केली जाते. लोकमतच्या टीमने २८ जुलैला स्टिंग आॅपरेशन करून नेरूळमधील बालाजी टेकडी, एपीएमसीचे फळ मार्केट व इंदिरानगरमध्ये गांजा विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले होते. मसाला मार्केटमध्ये गांजाची लागवड केल्याचेही छायाचित्रासह स्पष्ट केले होते. यानंतर पोलिसांनी चारही ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. याप्रकरणी एपीएमसी व नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले होते. या कारवाईमुळे काही दिवस बंद झालेली अमली पदार्थांची विक्री आता पुन्हा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे फळ मार्केटमध्ये गांजा विक्री बंद झाली असली तरी भाजी मार्केटमध्ये मात्र अद्याप गांजाची विक्री सुरूच आहे. गांजा माफिया हरिदास विधातेचा व्यवसाय जोरात सुरू आहे. पोलिसांनी तडीपारीची कारवाई केलेला हरिदासचा मुलगा दत्तात्रय विधाते गांजा विक्रीचे रॅकेट चालवत आहे. भाजी मार्केटच्या सहा नंबर गेटच्या आतमध्ये ही विक्री सुरू आहे. कोणीही जावून पुडी मागितली की तेथे उभे असलेले विक्रेते लगेच काढून देत आहेत. येथून काही अंतरावर धान्य मार्केटच्या समोरील झोपडपट्टीमध्येही मोठा अड्डा सुरू आहे. कविता नावाची महिला गांजाची विक्री करीत असून येथूनही रोज हजारो रूपयांची उलाढाल होत आहे. सायन - पनवेल महामार्ग व कोल्डस्टोरेजच्या मागील बाजूलाही नवी मुंबईतील सर्वात जुना अशोकचा अड्डा अद्याप सुरूच आहे. तुरूंगातून नुकताच बाहेर आलेला अशोक बिनधास्तपणे व्यवसाय करत आहे. सोमवारपर्यंत त्याच्याकडे गांजा मिळत होता. कारवाईची कुणकुण लागताच मंगळवारी आलेल्या ग्राहकांना माल संपला असल्याचे तो सांगत होता. वाशी-तुर्भे रोडवर कांदा बटाटा मार्केट व पेट्रोल पंपाच्या मध्ये असलेल्या सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या बाजूला अनेक वर्षांपासून गांजा विक्री होत आहे. इतर सर्व ठिकाणी गांजाची पुडी घेवून जातात. येथे मात्र गांजा विकत घेवून तेथेच तो ओढला जातो. दिवसभर गांजा ओढणाऱ्यांची मैफल सुरू असते. सुनील नावाचा सराईत माफिया येथील रॅकेट चालवत आहे. याशिवाय गोऱ्या नावाचा अजून एक माफिया चक्क एमडी पावडरचीही विक्री करत आहे. ८०० ते १ हजार रूपयांना पुडी विकली जाते. येथे गांजा कोणालाही दिला जात नाही. रिक्षा चालकांबरोबर संगनमत करून त्यांच्या मध्यस्थीने गांजा विकला जात आहे. एमडी पावडरसाठी विक्रेत्याचा मोबाइलवर संपर्क साधावा लागतो. भाजी मार्केटचे सहा नंबर गेट एपीएमसीच्या भाजी मार्केटच्या सहा नंबरचे गेटच्या आतमध्ये सायंकाळी सहा वाजता लोकमतची टीम पोहचली. टेंपोजवळ उभ्या असलेल्या तरूणांना विचारले गांजाची पुडी हवी. ५० रूपये देताच लगेच पुडी काढून देण्यात आली. दिवसभर कधीही या पुडी मिळेल असे सांगण्यात आले. गांजा विक्रेत्यांनी येथील प्रसाधनगृह देखभालीचा ठेका घेतला असून त्याच्या आडून हा व्यवसाय सुरू आहे. हरिदास विधातेचा हा जुना अड्डा असून त्याचा तडीपार मुलगा दत्तात्रय आता तो चालवत आहे. गांजा ओढणाऱ्यांची मैफलकांदा मार्केट व पेट्रोल पंपाच्या मध्ये असलेल्या शौचालयासमोर गांजा विक्री केली जाते. सुनील नावाची व्यक्ती हे रॅकेट चालवत आहे. याठिकाणी गांजा खरेदी करून तेथेच ओढण्याची परवानगीही आहे. चार ते पाच जण मिळून बिनधास्तपणे गांजा ओढत बसलेले असतात. खुलेआम सुरू असलेल्या या प्रकारावर काहीच कारवाई होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. एमडी पावडरची विक्री कांदा मार्केटजवळील सुनीलच्या गांजा विक्रीच्या अड्ड्याजवळ गोऱ्या नावाचा माफिया एमडी पावडरची विक्री करतो अशी माहिती सूत्रांनी दिली. येथे जावून ती खरेदी करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणालाही ती पावडर दिली जात नाही.एका मोबाइल नंबरवर फोन करावा लागतो. हा नंबरही नियमित ग्राहकांकडेच असतो. त्यांनाच त्याची विक्री केली जात असल्याचे सांगितले.
अमली पदार्थ विक्रेत्यांचा धुडगूस सुरूच
By admin | Updated: August 10, 2016 03:36 IST