अनिकेत घमंडी, डोंबिवली - अक्षय तृतीयेच्या दिवशी २ मे रोजी शुक्रवारी डोंबिवलीत दिवसाढवळ्या मुख्य बाजारपेठेतील राजरत्न ज्वेलर्सच्या दुकानात २.७० कोटींची चोरी होऊन आठ किलो सोन्या-चादींचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. त्या घटनेच्या तपासाची चक्रे कागदावर प्रचंड वेगाने फिरली असली तरी प्रत्यक्षात मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. येथील मानपाडा रोडवरील कस्तुरी प्लाझा या प्रचंड वर्दळीच्या संकुलात भरदिवसा ही घटना घडूनही अद्याप कोणताच धागादोरा पोलिसांना न गवसल्याने व्यापार्यांत घबराट आहे. पावणेदोन तासांच्या आत चोरट्यांनी दुकानातील सर्व दागिने लंपास करून धूम ठोकली होती. तेव्हापासून या प्रकरणाबाबत पोलिस आयुक्त,अतिरिक्त आयुक्त आणि विभागीय पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आदींसह गुन्हे शाखा आणि तब्बल चारहून अधिक पथके या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी दिवसरात्र एक करीत असल्याचे पोलीस सूत्रांनीच सांगितले. तब्बल पंधरा दिवसांनंतरही तो तपास कागदावरच जोरदार धावपळ करत असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही चोरी झाली त्या रामनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठांना या चोरी प्रकरणाबाबत केवळ ‘आदेश’ पाळण्याचे आदेश असून त्यांना तपासाची कोणतीही सूत्रे सोपविण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच तेही प्रचंड अस्वस्थ आहेत. पोलिसांनी दुकानदाराशी केलेल्या चर्चेवरुन तब्बल आठ किलो सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. याच धर्तीवर सुरु आहे तपास : ही चोरी कशी व का झाली असावी, मालकाचा कोणावर संशय आहे का? परिसरात कोणकोणत्या व्यक्तींचा संचार होता, तसेच या इमारतीच्या मागील बाजूकडून कुठून प्रवेशद्वारे आहेत. अशा पद्धतीनेच अद्यापही तपास सुरु आहे, हा तपास तर चोरी झाल्याचे समजल्यापासून सुरु असून अद्यापही काहीही हाती न लागल्याने या चोरीचे गूढ वाढत चालले असल्याची चर्चाही व्यापार्यांमध्ये आहे. त्या श्वानपथकाची मदतीचे काय झाले? : घटना घडल्यावर तातडीने त्या ठिकाणी श्वानपथकाच्या सहाय्याने दुकानाचा सर्व परिसर आणि त्या इमारतीचा परिसर श्वानपथकाच्या माध्यमातून पिंजून काढण्यात आला. त्यामध्ये या घटनेपासून एका विशिष्ट ठिकाणी एका चहावाल्याच्या परिसरात श्वान गेले आणि तेथे मोठ्याने भुंकू लागले, घुटमळल्याचेही पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले होते, त्याचे काय झाले अशीही चर्चा सुरु आहे.
डोंबिवलीतील ज्वेलर्स चोरीचा तपास कागदावरच!
By admin | Updated: May 21, 2014 04:44 IST