कांता हाबळे, नेरळकर्जत तालुक्यात अनेक गावे व आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना स्थानिकांना डावलून तालुक्यातील पाली-भूतिवली धरणातून कल्याण-डोंबिवलीकरांसाठी पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या १० दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीसाठी दररोज सुमारे ५० एमएलडी पाणी कालव्यातून उल्हास नदीत सोडण्यात येत आहे. या पाण्यावर कल्याण -डोंबिवलीच्या नागरिकांची तहान भागविली जात आहे. त्यामुळे कर्जतच्या जनतेमधून पाटबंधारेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून याला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे.कल्याण - डोंबिवलीला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने तेथे पाणीकपात सुरु केली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पाली - भूतिवली धरणातून ५० एमएलडी पाणी दररोज उल्हास नदीतून सोडण्यात येत आहे. १३ टीएमसी क्षमता असलेल्या पाली-भूतिवली या धरणाच्या सांडव्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. त्यामुळे या धरणाचे पाणी अद्यापही स्थानिक शेतकऱ्यांना मिळाले नाही. सध्या या धरणात ६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून उपलब्ध पाणीसाठा आवश्यकतेनुसार खुला करण्याचे आदेश जलसंपदामंत्र्यांनी दिल्याचे समजते. त्यानुसार दररोज ५० एमएलडी पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कल्याण - डोंबिवलीसह २७ गावांसाठी २० एमएलडी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पाऊस पडेपर्यंत हा पाणीसाठा सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कर्जत तालुक्यात पाली -भूतिवली हा लघु पाटबंधारे प्रकल्प आहे. सिंचनासाठी बांधलेल्या या धरणाचे पाणी कालवे बांधले नसल्याने अद्याप शेतीसाठी सोडण्यात येत नाही. पाली-भूतिवली लघु पाटबंधारे प्रकल्प पाटबंधारे विभागाने बांधला असून २००३ मध्ये धरणाच्या जलाशयात पाणीसाठा झाला. हे धरण बांधण्यासाठी शासनाकडून सुमारे ५० कोटी रु पये खर्च आतापर्यंत करण्यात आला आहे. हे धरण कर्जत तालुक्याचा सर्वाधिक पाणीटंचाईग्रस्त भाग असलेला रेल्वेपट्टा हिरवागार करण्यासाठी बांधले आहे. परंतु याचा कोणताही लाभ कर्जतच्या जनतेला होत नाही. या धरणातून १५ किलोमीटर अंतराचे कालवे खोदून ते पाणी सावरगाव, कोषाणे, आषाणे, वावे, बेंडसे, उमरोली, डिकसळ, गारपोली, चिंचवली, उक्रु ल, वडवळी, आसल, भूतिवली, आसलपाडा, बेकरे, माणगाव, अंबिवली, जीते, एकसळ, बार्र्डी या गावात कालव्याद्वारे पोहचणार होते. परंतु अद्यापही कालव्याचे काम पूर्ण झाले नसल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. परंतु याच धरणातून ठाणे जिल्ह्यातील कल्याण -डोंबिवलीच्या जनतेची तहान भागविली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.धरण बांधण्यासाठी एक गाव आणि एका आदिवासी वाडीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना विस्थापित केले. त्यांचा मोठा वाटा पाली-भूतिवली धरणाच्या उभारणीमध्ये असताना शेतीसाठी धरणाचे पाणी अद्याप पोहचले नाही. ज्यांचे कोणतेही योगदान नसलेल्या बिल्डरला पाणी विकण्याचे काम सरकार करीत असल्याचे दिसून येत आहे. या धरणातून अनेक वर्षांपासून एका बिल्डरला जात असल्याचे समजते. त्यामुळे या धरणातून पाणी सोडण्याला स्थानिकांनी विरोध दर्शवला असून लवकर पाटबंधारे विभागाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार गेल्या १० दिवसांपासून पाली-भूतिवली धरणातून दररोज ५० एमएलडी पाणी कालव्यातून उल्हास नदीत सोडण्यात येत आहे. याआधी आमदारांच्या पत्रानुसार शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले होते. अपूर्ण कालव्याचे काम लवकरच करु न शेतकऱ्यांना पाणी दिले जाणार आहे.-एस. के. कांबळे, उपविभागीय अधिकारी, लघुपाटबंधारे विभाग पाली-भूतिवली धरणाचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. परंतु स्थानिक शेतकऱ्यांना पाणी देण्याऐवजी कल्याण-डोंबिवलीकरांना पाणी दिले जाते. त्याला आमचा विरोध आहे. - सुरेश लाड, आमदार-कर्जत
‘भूतिवली’चे पाणी कल्याणला
By admin | Updated: June 4, 2016 01:48 IST