ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची तुलना हिटलरशी करत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'देशातील एकच व्यक्ती हिटलर बनण्याच्या मार्गावर आहे असे माझे मत होते, मात्र दुसरी व्यक्तीही याच मार्गावर आहे असं आता वाटतयं. देवा, भारताला वाचव!' असे ट्विट करत दिग्विजय सिंह यांनी भागवतांवर टीकास्त्र सोडले. 'हिंदुस्थान हे हिंदूंचेच राष्ट्र आहे,’ या भागवतांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना दिग्विजय सिंह यांनी हे ट्विट केले असून 'हिंदुत्व ही धार्मिक ओळख आहे का? सनातन धर्माशी हिंदूत्वाचे नाते काय असा सवाल त्यांनी भागवतांना विचारला आहे. तसेच ' जर एखादी व्यक्ती इस्लाम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध यापैकी एखाद्या धर्माला मानणारा असेल, तर ती व्यक्ती पण हिंदूच ठरते का' याबद्दलही भागवत यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही सिंह यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निष्पाप लोकांना धर्माच्या नावाखाली फसवून राजकारण करू नये, असा सल्लाही सिंह यांनी भागवतांना दिला आहे.
रविवारी विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंती महोत्सवात भागवत यांनी 'हिंदुस्थान हे हिंदूंचेच राष्ट्र आहे' या वादग्रस्त वक्तव्याचा पुनरुच्चार केला. भागवत पुढे म्हणाले की, हिंदुत्व ही राष्ट्राची ओळख आहे. हिंदू धर्मात इतकी अंगभूत शक्ती आहे की, इतर संप्रदायांनाही तो सामील करून घेऊ शकतो. तसेच अस्पृश्यता संपवल्याशिवाय हिंदूंना गर्वाने हिंदू असल्याचे म्हणता येणार नाही. प्रत्येकाने स्वत:पासून आणि स्वत:च्या घरापासून याची सुरुवात केली, तर येत्या ५ वर्षांत प्रत्येक मंदिर, पाणवठा आणि स्मशान हे सर्व हिंदूंसाठी खुले होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.