राज्यात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा
By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST
दुष्काळाची छाया : २ हजार ५२६ धरण प्रकल्पांत केवळ ४७ टक्के पाणी
राज्यात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा
दुष्काळाची छाया : २ हजार ५२६ धरण प्रकल्पांत केवळ ४७ टक्के पाणीपुणे : राज्यात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा असून दुष्काळाची छाया दाट झाली आहे. मॉन्सूनमध्ये आगामी काळात पावसात पडणार्या मोठ्या खंडामुळे व कडक उन्हाच्या झळांमुळे खरिपाच्या पेरण्या जिरायती भागात धोक्यात येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत राज्यातील छोट्या मोठ्या २ हजार ५२६ धरण प्रकल्पांत केवळ ४७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. ऑगस्टमध्ये मंदावत गेलेल्या पावसामुळे ही टक्केवारी कमीच राहिली असून दोन वर्षांपूर्वी याच सुमारास धरणांत ७५ टक्के तर गेल्या वर्षी याच तारखेला ६१ टक्के पाणी साठा होता. आजमितीस राज्य शासनाच्या २ हजार ५१० व खासगी १६ अशा एकूण २५२६ प्रकल्पांमध्ये प्रकल्पीय साठा ३७ हजार ५०७ द.ल.घ.मी. व उपयुक्त पाणीसाठा १७ हजार ७६५ द.ल.घ.मी. आहे. त्याची टक्केवारी ४७ आहे, असे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. कोकणातील १५८ प्रकल्पांमधील साठ्याची तुलनेने स्थिती बरी असून ८० टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील ८१४ प्रकल्पांत ८ टक्के, नागपूरमधील ३६६ प्रकल्पांत ६७ तर अमरावतीमधील ४५३ धरणांमध्ये ५९ टक्के पाणीसाठा आहे. नाशिकमधील ३५० धरणांत ४० टक्के आणि पुणे विभागातील ३६९ प्रकल्पांत ५१ टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील सर्व मोठ्या, मध्यम व लघु अशा २ हजार ५२६ धरण प्रकल्पांत ३७ हजार ५०७ द.ल.घ.मी.पाणीसाठा असून त्यापैकी केवळ १७ हजार ७६५ द.ल.घ.मी. साठा उपयुक्त, म्हणजे पिण्यासाठी, शेतीसाठी वापर करण्याजोगा आहे. पावसाळ्याच्या आजपर्यंतच्या अडीच महिन्यांच्या एकत्रित पाणीसाठ्याची बेरीज ३७ हजार ५०७ द.ल.घ.मी. असून दोन वर्षांच्या तुलनेत तो खूपच कमी असल्याने चिंता निर्माण झाली आहे. २ हजार ८६९ धरण प्रकल्पांत गेल्या वर्षी १८ ऑगस्टच्या सुमारास २२ हजार ८६९ दशलक्ष घन मीटर (द.ल.घ.मी.) म्हणजे ६१ टक्के तर २०१३ मध्ये, दोन वर्षांपूर्वी याच तारखेला ७५ टक्के म्हणजे २८ हजार १७१ द.ल.घ.मी. पाणीसाठा होता. मोठ्या धरणांची संख्या कोकण, मराठवाडा, नागपूर, अमरावती, नाशिक व पुणे विभागात ८४ असून त्यात ९ हजार १५६ द.ल.घ.मी , मध्यम प्रकल्पांची संख्या २२२ असून त्यामध्ये २ हजार ६५ द.ल.घ.मी तर लघु प्रकल्पांची संख्या २ हजार २०४ प्रकल्पांत १६३२ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे.