वाळूज लोकमत आपल्या दारी
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
सिडकोकडून सेवाकराची सक्तीने वसुली, मात्र सुविधा देण्यास टाळाटाळ
वाळूज लोकमत आपल्या दारी
सिडकोकडून सेवाकराची सक्तीने वसुली, मात्र सुविधा देण्यास टाळाटाळ - अनेक समस्यांनी नागरिक त्रस्तवाळूज महानगर : सिडको प्रशासनाकडून सेवाकराची सक्तीने वसुली करूनही नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पाणी, स्वच्छता, ड्रेनेजलाईन, रस्ते, वीज आदी सुविधा मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची ओरड सिडको वाळूज महानगरातील देवगिरीनगर, जिजामातानगर व ग्रोथ सेंटर भागातील नागरिकांनी लोकमतकडे व्यक्त केली. सिडको वाळूज महानगरातील नागरिकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी सिडको प्रशासनाची आहे. सिडको प्रशासन विविध सेवाकराच्या नावाखाली नागरिकांकडून सक्तीची कर वसुली करीत आहे. मात्र, प्रशासन नागरी सुविधा पुरविण्यास चालढकलपणाचे धोरण अवलंबत आहे. सिडकोच्या मुख्य प्रशासकपदाचा कार्यभार सुनील केंद्रेकर यांनी हाती घेतल्याने व त्यांच्या कामाची कारकीर्द पाहता नागरी समस्या सुटतील, अशी आशा नागरिकांमध्ये होती. केंद्रेकर यांनी पदभार स्वीकारताच दिलेल्या आश्वासनानुसार सिडकोतील विविध विकास कामाला सुरुवातही केली होती; परंतु मध्यंतरी सुरू असलेली विकासकामे रखडली. सेवाकराच्या नावाखाली नागरिकांवर सिडको प्रशासनाने वाढीव कर लावला. वाढीव कर लावूनही अधिकार्याच्या कामचुकारपणामुळे नागरिकांना पायाभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे नागरिकांना विविध समस्येला सामोरे जावे लागत आहे. सिडको वाळूज महानगरातील देवगिरीनगर, जिजामातानगर व ग्रोथ सेंटर भागातील नागरिक रस्ते, स्वच्छता, पाणी, लाईट आदी सुविधांअभावी त्रस्त झाले आहेत. या भागातील अंतर्गत रस्ते उखडले आहेत. पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. वेळेवर साफसफाई केली जात नाही. कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने नागरी वसाहतीलगतचा कचरा अनेक दिवस जागेवरच पडून असतो. ड्रेनेजलाईन नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. नाल्या सफाईअभावी तुंबल्या आहेत. अस्वच्छता पसरल्याने परिसरात दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले आहे. दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (जोड आहे)