गोव्यामध्ये एका सोशल मीडिया व्लॉगर विरोधात रशियन तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या व्लॉगरने गोव्यामध्ये रशियन तरुणींचे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर केल्याचा आकोप आहे. एका सोशल मीडिया युझरने या व्हिडिओंबाबत पोलिसांना मेन्शन केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका युझरने या व्लॉगरने पोस्ट केलेल्या व्हिडीओंविरोधात तक्रार दिली. या व्हिडीओमध्ये गोव्यातील बिचवर उन्हात आराम करत असलेल्या रशियन तरुणी दिसत होत्या. स्वत: बांगलादेशी असल्याचे सांगणाऱ्या या व्लॉगरने अशा प्रकारचे आणखीही व्हिडीओ शेअर केलेले होते. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार हे व्हिडीओ सुमारे आठ ते नऊ महिन्यांपूर्वी पोस्ट करण्यात आले होते.
या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर गोवा पोलिसांनी त्वरित कारवाई केली. तसेच सायबर पोलीस ठाण्याला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. सायबर क्राईम सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या व्लॉगरच्या हालचालींची माहिती घेतली जात आहे. तसेच तपासानंतर या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गोव्यामधील पर्यटकांच्या प्रायव्हसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोशल मीडियावर काही लोक ही बाब म्हणजे पर्यटकांच्या प्रायव्हसीचं उल्लंघन असल्याचं बोलत आहेत. तसेच या व्लॉगरविरोधात कारवाईची मागणी करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या लोकांनी अशा प्रकारच्या व्हिडीओंची माहिती तातडीने पोलिस खात्यामधील संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी, असं आवाहन गोवा पोलिसांनी केलं आहे.