ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - राष्ट्रकूल आणि अन्य घोटाळ्याशी संबंधित व्यक्तींची नावे वगळण्यासाठी यूपीए सरकारमधील काही नेत्यांनी माझ्यावर दबाव टाकला होता असा गौप्यस्फोट नियंत्रण आणि महालेखापरिक्षक विभागाचे (कॅग) माजी प्रमुख विनोद रॉय यांनी केला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला विनोद रॉय यांनी मुलाखात दिली असून या मुलाखातीमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 'काही नेते माझ्या घरी आले होते व त्यांनी राष्ट्रकूल आणि कोळसा घोटाळ्याप्रकरणी कॅगने दिलेल्या अहवालातून काही व्यक्तींची नावे हटवा किंवा त्यांना वाचवा' असे मला सांगितल्याचा दावा रॉय यांनी केला. नॉट जस्ट अकाऊंटेट या पुस्तकातून आणखी काही माहिती सर्वांसमोर येईल असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानपदाची जबाबदारी महत्त्वाची असते व मोठ्या प्रकरणांमध्ये कठोर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार त्यांच्याकडेच असतो. पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही प्रकरणांमध्ये कठोर निर्णय घेतले नाही असा गंभीर आरोपही त्यांनी केला.