सिकेरीत हेलिकॉप्टर सेवा नकोच
By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST
सभेत निर्धार : सेवा पुनश्च सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास प्रखरपणे विरोध
सिकेरीत हेलिकॉप्टर सेवा नकोच
सभेत निर्धार : सेवा पुनश्च सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास प्रखरपणे विरोध म्हापसा : पर्यटन खात्यामार्फत सिकेरी-कांदोळी येथे हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याच्या योजनेस सरकारने सध्या स्थगिती दिली असली तरी ही सेवा पुनश्च सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास प्रखरपणे विरोध करण्याचा निर्धार रविवारी सिकेरी येथे झालेल्या सभेत करण्यात आला. सिकेरी-कांदोळी येथून पर्यटकांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यास स्थानिक विरोध करीत आहेत. या संदर्भात नागरिकांच्या स?ांचे निवेदनही सरकारला सादर केले आहे. या संदर्भात रविवारी सिकेरी येथील सेंट लॉरेन्स चर्चच्या प्रांगणात सभा झाली. या सभेला कळंगुटचे आमदार मायकल लोबो, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, कांदोळीच्या सरपंच सेंड्री फियेलो, काँग्रेसचे प्रवक्ता सुनील कवठणकर, अमरनाथ पणजीकर, अँड. यतीश नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. लोबो यांनी ही सेवा सुरू करण्यास आपला विरोध असल्याचे जाहीर केले. राज्यात पर्यटकांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासाठी सरकारने तीन जागा सुनिश्चित केल्या आहेत. यात सिकेरी आग्वाद येथील जागेचाही समावेश आहे. ज्या जागेवर सरकार ही सेवा सुरू करू इच्छिते ते वारसास्थळ असून ते वारसास्थळच राहिले पाहिजे, असे विचार त्यांनी मांडले. पर्यटकांना आकर्षित करणे हे सरकारचे काम आहे; पण सरकारने केलेल्या या यत्नाला लोकांकडून विरोध होत असेल तर ते बंद झाले पाहिजे. सरकार जर लोकांच्या विरोधाला न जुमानता असे प्रकल्प आणीत असेल तर त्याला विरोध झालाच पाहिजे. ज्या ठिकाणी ही सेवा सुरूकरण्याचा प्रयत्न सुरू आहे तो भाग विकास करण्यास प्रतिबंधित असलेला भाग असल्याचे लोबो या वेळी म्हणाले. कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी लोबोंवर जोरदार टीका केली. कळंगुट तसेच कांदोळी भागातील लोकांना अनेकवेळा लोबो यांनी दिलेला शब्द फिरवल्याचे ते म्हणाले. या वेळी त्यांनी लोकांना शब्द दिलेला पाळावा व लोकांबरोबर राहावे, असे आवाहन लोबोंना केले. सरकारने या सेवेचे काम सध्या बंद केले असले तरी कोणत्याही क्षणी ते सुरू होण्याची शक्यता असून लोकांनी त्याला विरोध करण्यासाठी तयार राहण्याचे आव्हानही फर्नांडिस यांनी केले. अँड. यतीश नाईक यांनी लोकहिताविरोधातले अशा प्रकारचे प्रकल्प सरकार लोकांवर लादू पाहात असल्याचा आरोप केला. अशा अनेक गोष्टींवर लोक जरी शांत असले तरी सरकारने लोकांचा अंत पाहू नये, असाही इशारा त्यांनी आपल्या भाषणातून दिला. या वेळी या सेवेविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार करण्यात आला. सरकारने तात्पुरती ही सेवा बंद केली असली तरी परत सुरू करण्याचा यत्न झाल्यास डाव हाणून पाडण्याचे ठरविण्यात आले. सभेला उपस्थित इतर लोकांनीही आपले विचार मांडले. (खास प्रतिनिधी) फोटो- सिकेरी-कांदोळी येथील हेलिकॉप्टर सेवेला विरोध करणार्या सभेत उपस्थित आमदार मायकल लोबो, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस व जनसमुदाय. (ईमेल केला आहे)