दोन फरार अधिकार्यांना अटक
By admin | Updated: August 26, 2015 00:18 IST
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा
दोन फरार अधिकार्यांना अटक
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ घोटाळाजालना : येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात ८ कोटी ५७ लाख ८८६ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चार महिन्यांपासून फरार असलेल्या जिल्हा व्यवस्थापक मधूकर बापूराव वैद्य व लिपीक अशोक एकनाथ खंदारे या दोघांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी सायंकाळी अटक केली. मंगळवारी दोघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जालना येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात वैद्य व खंदारे यांनी संगनमत करून महामंडळाच्या ८ कोटी ५७ लाख ८८६ रुपयाच्या निधीचा अपहार केल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर महामंडळाचे औरंगाबाद परिक्षेत्राचे प्रादेशिक व्यवस्थापक अनिल म्हस्के यांनी २३ एप्रिल रोजी कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या दोघांविरूद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच हे दोघेही फरार झाले होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळला होता. अखेर चार महिन्यांनंतर २४ ऑगस्ट रोजी वैद्य याला बीड येथून, तर खंदारे याला जालन्यातून अटक करण्यात आली.