ऑनलाइन टीम
बडोदा, (गुजरात) - गुजरातेत २६ पैकी २६ आणि देशभरात २८५ हून अधिक जागांवर विजय मिळवल्यावर मोदींनी देशभरातील नागरिकांना उद्देशून भाषण केले. माझ्या सारख्या समान्य कुटुंबातील मुलाला देशाने आज या स्तरावर आणून ठेवले, याबद्दल मी गुजरात आणि देशभरातील जनतेचा आभारी आहे, असं म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानले. तसेच आपल्यावर सडकून टीका करणा-या लोकांना उत्तर मिळालंय असंही त्यांनी म्हटलं. तसेच पॉलिटीकल पंडितांना आपले विचार बदलावे लागतील असं म्हणत त्यांनी विरोधकांवर तोफ डागली. माझ्यावर आलेली संकटंही मोठीच होती आणि मला मिळालेली फलश्रुतीही मोठीच आहे. पॉलिटीकल पंडितांची सर्व भाकितं खोटी ठरली आहेत. माझे विरोधक हे माझा विरोध करत होते. पण त्यांच्या लक्षात आले नाही, की माझा विरोध करताना त्यांना विकासावरच बोलावे लागले. दुस-या कोणत्या मुद्द्यावर नाही. मोदी हा कसा जादूगार आहे हे मी दाखवून दिलं. आज आपला भारत देश ४० वर्ष पुढे असता पण दुर्दैवाने तसं झालं नाही. या गोष्टी काढण्यात आता अर्थ नाही. असं म्हणंत त्यांनी गांधीजींच्या आंदोलनाची आठवण करून देत देशातील जनता आपलं काम करताना कसं आपण देशासाठी करत आहोत याचे उदाहरण दिले. आज देशातील कोणताही व्यापारी प्रामाणिकपणे आपला माल विकत असेल, कोणताही शिक्षक प्रामाणिकपणे काम करत असेल विद्यार्थी प्रमाणिकपणे शिक्षण घेत असेल तर तो त्याचे कर्तव्य देशासाठीच करतोय असं त्यांनी म्हटलं. या देशातील प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे केले तर देश एका एका पाऊलाने जरी पुढे गेला तरी, हा देश सव्वाशे कोटी पाऊलांनी पुढे जाईल असं त्यांनी म्हटलं. देशातील सर्व जटील समस्यांवर विकास हा एकच उपाय असल्याचे मोदींनी म्हटले.