महामार्गावर उभ्या राहणार्या ट्रक
By admin | Updated: December 13, 2015 00:07 IST
मधून डिझेल चोर्यांना अटक
महामार्गावर उभ्या राहणार्या ट्रक
मधून डिझेल चोर्यांना अटकसिन्नर : नाशिक- पुणे महामार्गावर रात्रीच्यावेळी उभ्या राहणार्या मालट्रकमधून डिझेलची चोरी करुन पळालेल्या चोरट्यांना सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या शिताफीने चोवीस तासाच्या आत जेरबंद केले. चोरीसाठी वापरलेल्या वाहनाच्या क्रमांकावरुन पोलिसांना संशयित चोरट्यांना गजाआड करण्यात यश आले. गुरुवारी रात्री महालक्ष्मी हिवरा (ता. नेवासा, जि. अ.नगर) येथील ट्रकचालक देवीदास बढे याने रात्री उशीर झाल्याने झोप येत असल्याने त्याच्या ताब्यातील मालट्रक (क्र. एम. एच. २० डी. ई. २१३३) हा नाशिक-पुणे महामार्गावर गुरेवाडी शिवारात श्री स्वामी समर्थ पेट्रोल पंपाच्या आवारात लावून ट्रकमध्ये झोपी गेला. यावेळी तीन चोरटे ट्रकजवळ आले. त्यांनी डिझेल टाकीच्या खालच्या बाजूचा नट खोलून डिझेल काढण्यास प्रारंभ केला. यावेळी पेट्रोलपंपावर रात्रपाळीला असलेल्या मनियार नावाच्या कर्मचार्याला संशय आल्याने त्याने तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फोन केला. पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी तातडीने जवळच राहणारे पोलीस हवालदार देवीदास लाड यांना घटनेची माहिती देवून घटनास्थळी पाठविले. हवालदार लाड यांनी त्याची मारुती कार घेवून पेट्रोलपंप गाठला. तोपर्यंत चोरट्यांनी ट्रकमधील सुमारे २५ लिटर डिझेल काढले होते. चोरट्यांनी डिझेलचा ट्रम त्यांच्या ताब्यातील टाटा मॅक्स- छोटा हत्ती (क्र. एम. एच. १५ ए. वाय. १२५७) मध्ये टाकला. लाड घटनास्थळी पोहचताच चोरटे त्यांच्या वाहनातून सिन्नरच्या दिशेने पळू लागले. लाड यांनी पेट्रोलपंपावरील दोन कर्मचार्यांना घेवून मारुती कारने त्यांचा पाठलाग सुरु केला. लाड यांनी नाशिकरोडपर्यंत चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरट्यांनी कारला कट मारुन पळून जाण्यात यश मिळविले. हवालदार लाड यांनी सदर वाहनाचा क्रमांक पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी दिला होता. सपकाळे यांनी तातडीने सदर वाहन कोणाच्या मालकीचे आहे याचा तपास काढला. सदर वाहन इंदिरानगर (वडाळा), नाशिक भागातील असल्याचे खात्री पटली. शुक्रवारी सकाळी सपकाळे यांनी हवालदार लाड, डी. एन. खतीले, तुषार मरसाळे, गौरव सानप, सुनील जाधव यांचे पथक वडाळा व इंदिरानगर भागात पाठविले.या पथकाने संशयित आरोपी विशाल विलास वाघचौरे (२३) रा. कलानगर, इंदिरानगर नाशिक, अझर निशार शेख (२४) व शौकत सैय्यद इब्राहीम (२०) दोघेही रा. भारत नगर, वडाळा, नाशिक यांना ताब्यात घेतले. संशयित डिझेल चोरट्यांना पोलिसांनी सिन्नर न्यायालयात उभे केल्यानंतर त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सपकाळे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)(जोड)