नवी दिल्ली : नाताळच्या (ख्रिसमस) सुटीच्या मुद्याचा वाद अजूनही संपलेला नाही. नाताळच्या दिवशी शाळा उघड्या ठेवण्याची सरकारची चाल असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. दुसरीकडे सत्ताधारी सदस्यांनी गांधी कुटुंबाला लक्ष्य करीत प्रत्युत्तर दिले.सरकार संघपरिवाराचा अजेंडा अंमलात आणून सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा २५ डिसेंबर हा जन्मदिन ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा केला जात असून त्यामुळे नाताळच्या सुटीवर परिणाम होणार नाही, असे उत्तर सरकारने दिले, मात्र त्यावर समाधान न झाल्याने वरील पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. नायडूंच्या विधानामुळे तणाव...संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांना तोंड देताना गांधी कुटुंबाला लक्ष्य बनविले. त्यांच्या विधानावर काँग्रेस सदस्यांनी जोरदार घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. विरोधकांनी माझ्या कुटुंबाला लक्ष्य बनविले आहे. त्यामुळे मी हा शाब्दिक हल्ला केला, ते त्यांचे शब्द मागे घेणार असतील तर मी माझे विधान मागे घेतो, असे नायडू म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नाताळ सुटीच्या मुद्यावर गदारोळ
By admin | Updated: December 18, 2014 05:08 IST