बुर्दवान : बंगालच्या बुर्दवान येथे गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या कार्यालयात झालेला भीषण स्फोट हा गॅस सिलिंडर फुटल्यामुळे नव्हे तर आयईडी या प्रगत अशा बॉम्बमुळे झाल्याचे उघडकीस आले आहे. नेत्याच्या घरीच त्याचे कार्यालय असून तेथे इंडियन मुजाहिदीनचे दहशतवादी आयईडी बॉम्ब तयार करण्याचे काम करीत असताना हा स्फोट झाला होता. यात दोन दहशतवादी ठार आणि एक जण जखमी झाला होता.विशेष म्हणजे स्फोटानंतर पोलीस जेव्हा घटनास्थळी दाखल झाले तेव्हा दोन महिलांनी बंदुकीच्या धाकावर पोलिसांना घराबाहेरच थांबण्यास भाग पाडले होते. आत याल तर अवघे घर स्फोटात उडवून देण्याची धमकी या महिलांनी पोलिसांना दिली होती, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. दरम्यान या दोन्ही महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या महिलांनी पोलिसांना घराबाहेरच रोखल्यामुळे घरातील अनेक कागदपत्रे आणि महत्त्वाचे पुरावेही आगीत नष्ट झाले. पोलिसांच्या हाती अर्धवट जळालेली पत्रके व कागदपत्रे लागली. ही पत्रके अल-कायदाचा नेता अयमान अल-जवाहिरी आणि इंडियन मुजाहिदीनची होती. एक महिन्यापूर्वीच जवाहिरीने भारतात लढा पुकारण्याची धमकी दिली होती.या स्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून आरडीएक्ससह ५५ आयईडी, मनगटी घड्याळांचे अनेक डायल्स आणि सीमकार्ड जप्त केले. अनेक आयईडी बॉम्ब तयार करून नंतर भारतातील अनेक शहरांमध्ये स्फोट घडवून आणण्याचा इंडियन मुजाहिदीनच्या या दहशतवाद्यांचा कट असावा, असा सुरक्षा संस्थांचा संशय आहे. एनआयए, आयबी आणि अन्य केंद्रीय संस्थांचे अधिकारी बुर्दवानमध्ये दाखल झाले आहेत. तृणमूलचा खुलासाबॉम्बस्फोटाशी आणि या स्फोटात सामील असलेल्या लोकांशी पक्षाचा कसलाही संबंध नाही, असे तृणमूलने स्पष्ट केले आहे. भाजपा व माकपा हे बेजबाबदार वक्तव्ये करून ‘शांततापूर्ण’ बंगालमध्ये अशांतता निर्माण करीत आहेत, असा आरोपही तृणमूल काँग्रेसने केला. शकीलची पत्नी रुमी आणि हसनची पत्नी अमिना, घरमालक व तृणमूल नेता नरूल हसन चौधरी या तिघांना अटक करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)