नवी दिल्ली : राज्यसभेचे सदस्यत्व मिळाल्यानंतर उणेपुरे तीन दिवस संसदेत फिरकलेला व चालू वर्षात एकदाही उपस्थित न राहिलेला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला आज सोमवारी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठीही रजा मंजूर करण्यात आली़ तत्पूर्वी राज्यसभेत त्याच्या अनुपस्थितीचा मुद्दा बराच गाजला़ कौटुंबिक कारणास्तव आपल्याला चालू अधिवेशनाच्या उर्वरित काळातही अनुपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाचे सचिनचे पत्र मिळाले असल्याचे उपसभापती पी़ जे़ कुरियन यांनी आज सभागृहाला सांगितले़ त्यांची रजा मंजूर करण्यात येत असल्याचेही त्यांनी सष्ट केले़ याचदरम्यान सपाचे नरेश अग्रवाल यांनी यावर आक्षेप नोंदवला़ गत शुक्रवारी सचिन यांनी दिल्लीतील एका समारंभात भाग घेतला पण सभागृहात येण्यास त्यांच्याकडे वेळ नव्हता़ संसदेतील अशी दीर्घ अनुपस्थिती हा संसदच नव्हे तर देशाचा अपमान आहे, असे अग्रवाल म्हणाले़ही चुकीची परंपरा असल्याचे काँग्रेसचे सत्यव्रत चतुर्वेदी म्हणाले़ शिरोमणी अकाली दलाच्या सदस्यांनी त्यांच्या सूरात सूर मिसळला़ कुरियन यांनी आपण कुठल्याही सदस्याच्या रजेसाठीच्या कारणांची सत्यता पडताळून पाहू शकत नाही़ हे संसदीय मान्यतांच्याविरुद्ध होईल, असे स्पष्ट केले़ सचिन व अभिनेत्री रेखा यांना २०१२ मध्ये राज्यसभेचे नामनियुक्त सदस्य बनल्यापासून सचिन केवळ तीन दिवस तर रेखा सात दिवस सभागृहात हजर राहिली़ चालू अधिवेशनात तर हे दोन्ही सदस्य संसदेकडे फिरकलेही नाहीत़ यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यसभेत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी झाली होती़ तथापि त्यांनी सलग ६० दिवस दांडी मारली नसल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकत नाही, असे राज्ससभा सभापतींनी स्पष्ट केले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
तेंडुलकरची रजा राज्यसभेकडून मंजूर
By admin | Updated: August 12, 2014 01:59 IST