शिक्षक संपावर विद्यार्थी वार्यावर
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
न्यायडोंगरी : येथील कै. विजय शिवराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांनी संपावर असल्याचे सांगून शाळा बंद ठेवल्याने सुमारे एक हजार सातशे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.
शिक्षक संपावर विद्यार्थी वार्यावर
न्यायडोंगरी : येथील कै. विजय शिवराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांनी संपावर असल्याचे सांगून शाळा बंद ठेवल्याने सुमारे एक हजार सातशे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. शिक्षकांनी आम्ही सर्व संपावर आहोत, असे सांगून शाळाच उघडली नसल्याने या शाळेचे सुमारे एक हजार सातशे विद्यार्थी त्रस्त झाली. कोणतीही पूर्व सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नसल्याने बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थ्यांचे फारच हाल झाले. त्यांना लागलीच परत घरी जाण्यासाठी साधने नसल्याने विद्यार्थी गावात इकडे तिकडे फिरताना दिसत होते. याबाबत शाळेचे प्राचार्य नंदू गरूड यांच्याशी संपर्क साधला असता संपावर असल्याची पूर्व सूचना अगोदर देता येत नाही, असे सांगण्यात आले, तर संपावर असलेले सर्व शिक्षक व कर्मचारी दिवसभर विद्यालयाच्या प्रांगणात बसून होते. मात्र विद्यालयाचे कार्यालय अथवा एकही वर्ग दिवसभर उघडण्यात आलेला नाही. (वार्ताहर)