नवी दिल्ली : आतापर्यंत संसदेत केवळ वाक्युद्ध चालायचे; पण आता येथे कार्यालयाच्या जागेवरूनही वाद व्हायला लागले आहेत. संसद भवनातील ५ क्रमांकाचीच खोली हवी म्हणून तृणमूल काँग्रेस आणि तेलगू देसम पार्टीचे(तेदेपा)खासदार यांच्यात हा वाद जुंपला आहे. संसद भवनाच्या पहिल्या माळ्यावर ५ क्रमांकाची खोली आहे. गेल्या ३० वर्षांपासून या ठिकाणी तेदेपाचे कार्यालय होते. मात्र गत ६ तारखेला कार्यालयीन कक्षाची ही जागा कथितरीत्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँगेसला देण्यात आली. याउलट तेदेपाला सहाव्या माळ्यावरील कक्ष दिला गेला. काल सोमवारी तृणमूल खासदारांनी त्यांना दिल्या गेलेल्या कक्षाबाहेर तेदेपा नेत्यांच्या नावांच्या पाट्या काढून आपल्या पक्षनेत्यांच्या नावांच्या पाट्या लावल्या. आज मंगळवारी तृणमूल खासदार सुदीप बंदोपाध्याय, कल्याण बॅनर्जी आदींनी खोली क्रमांक ५ मध्ये संक्षिप्त बैठकही घेतली. पण अर्ध्या तासातच तेदेपा खासदार या ठिकाणी आले व त्यांनी तृणमूल नेत्यांच्या नावांच्या पाट्या हटवून आपल्या नेत्यांचे नामफलक त्या ठिकाणी लावले. यासंदर्भात लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार नोंदवली. यानंतर पत्रकारांशी बोलताना तेदेपा खासदार वाय. एस. चौधरी यांनी खोली क्रमांक ५ आपल्या पक्षाला दिला गेल्याचा दावा केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तेदेपा-तृणमूलचे खासदार भिडले
By admin | Updated: August 13, 2014 04:07 IST