ऑनलाइन टीम
रामेश्वरम, दि. १ - श्रीलंकेच्या नौदलाने २९ भारतीय मच्छिमारांना अटक केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेच्या ताब्यातील सर्व भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याचे आदेश श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी दिले असतानाच लंकेच्या नौदलाने पुन्हा एकदा भारतीय मच्छिमारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
रामेश्वरम येथील भारतीय मच्छिमार कच्चातिवू येथे मासेमारीसाठी गेले होते. या दरम्यान श्रीलंकेच्या नौदलाचे जवान तिथे दाखल झाले. या जवानांनी २९ भारतीय मच्छिमारांना अटक केली. तसेच त्यांच्या सहा बोटीही ताब्यात घेतला. जवानांनी मासेमारीसाठी नेलेल्या जाळीचेही नुकसान केल्याचे सांगितले जाते. 'पुन्हा या क्षेत्रात मासेमारी करायची नाही' अशी तंबी देत नौदलाच्या जवानांनी उर्वरित भारतीय मच्छिमारांना सोडून दिले आहे. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी श्रीलंकेने भारतीय मच्छिमारांच्या प्रश्नावर सकारात्मक पाऊल उचलत सर्व मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. आता दोन्ही देशांमध्ये या मुद्द्यावर नव्याने चर्चा होऊन कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.