ऑनलाइन टीमनवी दिल्ली, दि. १८ - फुटिरतावाद्यांशी पाकिस्तानने चर्चा केल्यामुळे भारताने पाकिस्तानविरोधात कडक पाऊल उचलले असून पाकिस्तानशी ठरलेली परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द केली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्रखात्याच्या अधिका-यांनी हुर्रीयत या फुटीरतावादी संघटनेचा नेता शब्बीर शाहची भेट घेतली तसेच आणखी तीन ते चार नेत्यांना ते उद्या भेटणार आहेत. त्यामुळे एकतर भारत सरकारशी बोला नाहीतर फुटीरतावाद्यांशी बोला असे स्पष्ट बजावत भारताने २५ ऑगस्ट रोजी होणारी बोलणी रद्द केली आहेत.
भारत व पाकिस्तान दोघांसाठी महत्त्वाच्या असलेल्या काश्मिर प्रश्नावर दोन देशांमध्ये चर्चा होणार होती. मात्र, पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी हुरियतच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावलं. हुरियत या फुटीरतावाद्यांची गेल्या अनेक वर्षांपासून काश्मिर प्रश्नामध्ये सहभागी करून घेण्याची मागणी आहे, तर भारताने द्विपक्षीय चर्चेवरच भर दिला आहे. फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्याआधी पाकिस्तानने भारताशी चर्चा करायला हवी होती, भारताची संमती घ्यायला हवी होती अशी भारताची भूमिका आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांमध्ये सीमाभागामध्ये पाकिस्तानने भारतीय जवानांवर व नागरी वस्त्यांवर हल्ले करण्याचे प्रकारही वाढले आहेत. गेल्या दहा दिवसात पाकिस्तानने सीमाभागात ९ वेळा शस्त्र संधीचे उल्लंघन केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानशी चर्चा न करण्याची भूमिका घेत पाकिस्तानला खणखणीत इशारा दिला आहे, की एकतर भारताशी चर्चा करा नाहीतर फुटीरतावाद्यांशी.