अहमदनगर : रब्बी पिकांच्या नुकसानभरपाईपोटी केंद्राने दिलेले पंधराशे कोटी राज्य सरकारच्या तिजोरीत पडून आहेत़ महिना उलटूनही हा निधी जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत अद्यापही झिरपला नाही़ शेतकर्यांच्या नावाने गळा काढणार्या सरकारनेच शेतकर्यांचे सातशे कोटी अडविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ सरकारच्या या उदासीनतेबाबत जिल्ह्यातील शेतकर्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे़पुरेसा पाऊस झाल्याने यंदा दुष्काळ हटला़ शेतकर्यांनी उधार उसणवारी करून पिके आणली़ पण, अतिवृष्टीने त्यावर नांगर फिरविण्याची वेळ आली़ शेतातून उत्पन्न दूरच़ पण केलेला खर्चही वसूल होऊ शकला नाही़ पाऊस पडूनही पैशांअभावी जिल्ह्यातील बळिराजा हवालदिल आहे़ अशा परिस्थितीत शेतकर्यांना आर्थिक मदतीची गरज असते़ केंद्राने सरकारने रब्बीच्या दुष्काळ सहाय्यता निधीची घोषणा करून शेतकर्यांना एक प्रकारे धीर दिला़ सरकारने सन २०१५-१६ मधील रब्बीच्या नुकसानभरपाईपोटी राज्य सरकारला १ हजार ५०० कोटींची मदत दिली़ राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी अहमदनगर व सोलापूर जिल्हेच फक्त या मदतीस पात्र आहेत़ नगर जिल्हा प्रशासनाने ७१३ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविलेला आहे़ याचाच अर्थ केंद्राकडून मिळालेल्या १ हजार ५०० कोटीतून ७१३ कोटी एकट्या नगर जिल्ह्याला मिळणार आहेत़ परंतु सरकारच्या अनास्थेमुळे ही मदत राज्याच्या तिजोरीतच अडकली आहे़ किमान दिवाळीत तरी सरकार मेहरबान होईल़ रब्बीचे अनुदान खात्यावर जमा कधी होणार, अशी विचारणा शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात दूरध्वनीवरून करत आहेत़ अजून निधी वर्ग झाला नाही़ निधी आल्यानंतर देऊ, असे उत्तर प्रशासनाकडून शेतकर्यांना दिले जात आहे़ नगर जिल्ह्यातील ७ लाख हेक्टरवरील रब्बीचे पिके वाया गेली़ बाधित शेतकर्यांची ७ लाख ८२ हजार ३६ आहे़ जिल्हा प्रशासनाने ७१३ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव सरकारला पाठविला होता़ त्यानुसारच केंद्राने हा निधीही दिला़ तसे वृत्तही वृत्तपत्रांतून झळकले़ त्यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या़ परंतु, राज्य सरकारकडून त्यावर अद्याप कोणतही कार्यवाही झाली नाही़ पुढील आठवड्यात जरी हा निधी मिळाला तरी शेतकर्यांना बँक खात्यावर तो जमा करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे़ परंतु सरकार ऐन दिवाळीत मेहरबान होणार की नाही, याबाबत साशंकता आहे़़़़़़़़़़़़़
राज्य सरकारनेच अडविले शेतकर्यांचे सातशे कोटी रब्बीचे ७१३ कोटी तिजोरीत पडून : केंद्राने मदत देऊन महिना उलटला
By admin | Updated: October 22, 2016 00:47 IST