नवी दिल्ली : दिल्ली आग्रादरम्यान अलीकडेच सुरू झालेल्या ‘गतिमान एक्स्प्रेस’पाठोपाठ येत्या जून महिन्यापासून भारतीय रेल्वेच्या रुळांवर ताशी २00 कि.मी. वेगाने धावणाऱ्या स्पेनच्या टॅल्गो ट्रेनची प्रायोगिक चाचणी घेतली जाणार आहे. ‘टॅल्गो’चा वेग गतिमान एक्स्प्रेसच्या तुलनेत ताशी ४० कि.मी.ने अधिक आहे. वजनाने हलकी असल्याने टॅल्गो ट्रेनमुळे रेल्वेला विजेची मोठी बचतही अपेक्षित आहे. रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात चाचणी घेण्यासाठी स्पेनच्या टॅल्गो कंपनीने बार्सिलोनाहून ९ डबे भारतात पाठवले आहेत. मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरात येत्या काही दिवसांत त्यांचे आगमन होईल. भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या रुळांवरच वजनाने हलकी असलेली ही ट्रेन चालवण्याच्या प्रयोगाला टॅल्गो कंपनीने अनुमती दिली आहे. या प्रयोगासाठी टॅल्गोला भारतीय रेल्वेने कोणतीही रक्कम अदा केलेली नाही. इतकेच नव्हे, तर अबकारी करांसह सारा खर्च स्पेनची कंपनीच करणार आहे.मुंबई बंदरावर येणाऱ्या टॅल्गो ट्रेनच्या डब्यांना सर्वप्रथम इज्जतनगर डेपोत पाठवले जाईल. त्यानंतर जून महिन्यात भारतीय रुळांवर या ट्रेनच्या ‘ट्रायल रन’ सुरू होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टॅल्गो ट्रेनचा पहिला प्रयोग बरेली-मोरादाबाददरम्यानच्या रेल्वेमार्गावर ताशी ११५ कि.मी. वेगाने होईल. या प्रयोगात ट्रेनच्या कंपनांची सखोल चाचणी घेतली जाईल. यानंतर मथुरा ते पलवल (हरियाणा) अंतरावर ताशी १८0 कि.मी. वेगाने टॅल्गोचा दुसरा ‘ट्रायल रन’ होईल. भारतीय रेल्वेच्या सध्याच्या रुळांवर हे दोन्ही प्रयोग यशस्वी ठरल्यास मुंबई-दिल्ली अंतरासाठी ताशी २00 कि.मी.च्या पूर्ण वेगाचा तिसरा प्रयोग होईल. (विशेष प्रतिनिधी)रूळ, सिग्नलमध्ये सुधारणादिल्लीच्या निझामुद्दीन रेल्वेस्थानकापासून आग्य्रापर्यंत गतिमान एक्स्प्रेसचा वेग सहन करण्यासाठी रेल्वेने रुळांमधे जसे खास परिवर्तन घडवले होते, त्याच धर्तीवर टॅल्गो ट्रेनच्या प्रयोगांसाठीही देशातल्या काही भागांत रुळांमध्ये आवश्यक दुरुस्त्या सध्या सुरू आहेत. रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात सध्याच्या रुळांमधे कोणतेही बदल न करतादेखील टॅल्गो ट्रेन ताशी १६0 ते २00 कि.मी. वेगाने धावू शकेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तथापि, रेल्वेच्या सिग्नलिंग यंत्रणेत, तसेच काही भागांत रुळांमध्येही त्यासाठी थोड्या सुधारणा तातडीने कराव्या लागतील. टॅल्गो ट्रेन चालवण्यासाठी कमी वीज वापरली जाते, कारण ती वजनाने हलकी आहे. रेल्वेलाच नव्हे, तर सर्वांनाच त्यासाठी त्याचे विशेष आकर्षण आहे.
स्पेनच्या टॅल्गो ट्रेनच्या जूनमध्ये होणार चाचण्या
By admin | Updated: April 18, 2016 02:38 IST