नवी दिल्ली : नेहरू-गांधी घराण्यावर काँग्रेसकडून काढण्यात येत असलेल्या चित्रपटात सोनिया गांधी यांची भूमिका हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मेरिल स्ट्रीप करणार आहे. ‘परिवार की देन’ असे शीर्षक असलेला हा चित्रपट बॉलीवूडचा आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टी दिग्दर्शित करीत आहे. मूळ योजनेनुसार हा चित्रपट केवळ पंचवीस मिनिटांचाच असणार होता. मात्र, प्रियंका गांधी-वड्रा यांनी स्वत: आदित्य चोप्राच्या कथेचे पुनर्लेखन करून त्याला तीन तासांचा पूर्ण चित्रपट बनविले. या चित्रपटात नेहरू-गांधी-वड्रा कुटुंबांनी राष्ट्राला दिलेल्या योगदानाची कहाणी आहे. आधी विक्रम भट हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. तथापि, नंतर त्यांचा पत्ता कट करण्यात आला. हा चित्रपट आता सिंघम फेम रोहित शेट्टी दिग्दर्शित करीत आहेत. इंदिरा गांधी यांची भूमिका प्रियंका गांधी यांनीच करावी, असा सुरुवातीचा मतप्रवाह होता. मात्र, प्रियंका यांनी लेखनासह कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी स्वीकारल्याने ही भूमिका प्रियंका चोप्राला देण्यात आली. ‘मेरी कोम’च्या जोरकस भूमिकेमुळे प्रियंका चोप्राला हा चित्रपट मिळाला. रोशन सेठ हे पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका वठविणार आहेत. सोनिया गांधी यांच्या भूमिकेसाठी हॉलीवूड अभिनेत्री ज्युलिया रॉर्बटस्ला हिची निवड करण्यात आली होती. मात्र, तिने या भूमिकेला नकार दिला. त्यानंतर मेरिल स्ट्रीप हिची निवड करण्यात आाली. मेरिल स्ट्रीपने या भूमिकेसाठी ७५ कोटींची मागणी केली असल्याची माहिती आहे. राजीव गांधींची भूमिका अमिर खान साकारणार आहे. अमिर खानने कोणतेही शुल्क न घेता या चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शविली. आपण इतिहासाचा भाग बनू पाहतो, असे तो म्हणाला. तो पडद्यावर उंची कशी जास्त दाखवायची याबाबत कमल हसन यांचा सल्ला घेत आहे. रणदीप हुडा हा रॉबर्ड वड्रा यांचे पात्र रंगवणार आहे. अनेक काँग्रेसनेत्यांनी या चित्रपटात दुय्यम भूमिका करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यांची स्क्रीन टेस्ट घेतल्यानंतरच शेट्टी अंतिम निर्णय घेणार आहेत. सुरुवातीच्या २५ मिनिटांच्या चित्रपटात राहुल गांधी यांना केवळ दूरध्वनीवर बोलताना दाखवले जाणार होते. नव्या तीन तासांच्या चित्रपटात त्यांच्या वाट्याला दहा मिनिटे आली आहेत. राहुल यांनी स्वत:ची भूमिका पडद्यावर साकारण्यास नकार दिला आहे. अद्याप ही भूमिका कोणालाही दिलेली नाही. रोहित शेट्टी योग्य कलाकाराच्या शोधात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मेरिल स्ट्रीप साकारणार सोनियांची भूमिका
By admin | Updated: August 14, 2014 01:54 IST