प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता केजरीवालांनी तातडीनं कारवाई करत जाहिरात मागे घेतली आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला निलंबितही केलं आहे.
दिल्लीच्या सरकारी जाहिरातीमध्ये सिक्कीमला दाखवला भारताचा शेजारी 'देश'; उडाली खळबळ
ठळक मुद्देनवी दिल्ली सरकारच्या जाहिरातीमध्ये सिक्कीमला भारताचा शेजारी देश म्हटल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या जाहिरातीत सिक्कीमला भारताच्या शेजारील असलेल्या भूतान आणि नेपाळच्या श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे. या जाहिरातीवर सिक्कीम सरकारनं लागलीच आक्षेप नोंदवला आहे.
नवी दिल्लीः नवी दिल्ली सरकारच्या जाहिरातीमध्ये सिक्कीमला भारताचा शेजारी देश म्हटल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या जाहिरातीत सिक्कीमला भारताच्या शेजारील असलेल्या भूतान आणि नेपाळच्या श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे भारतात एकच खळबळ उडाली आहे. या जाहिरातीवर सिक्कीम सरकारनं लागलीच आक्षेप नोंदवला आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता केजरीवालांनी तातडीनं कारवाई करत जाहिरात मागे घेतली आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला निलंबितही केलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, सिक्कीम हा भारताचा अविभाज्य भाग आहे. अशा चुका सहन केल्या जाऊ शकत नाहीत. ही जाहिरात मागे घेण्यात आली असून, संबंधित अधिका-यावर कारवाई करण्यात आली आहे. केजरीवालांनी उपराज्यपाल (एलजी) अनिल बैजल यांचे ट्विट पुन्हा रिट्विट करत कारवाईची माहिती दिली आहे. बैजल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "एका जाहिरातीद्वारे सिक्कीमला शेजारच्या देशांमध्ये स्थान देऊन भारतीय प्रादेशिक अखंडतेचा अवमान केल्याबद्दल नागरी संरक्षण संचालनालय मुख्यालयातील वरिष्ठ अधिका-याला त्वरित निलंबित करण्यात आले आहे. जाहिरात मागे घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.दिल्ली सरकारने जेव्हा नागरी संरक्षण कॉर्पोरेशनची ही जाहिरात प्रसिद्ध केली तेव्हाच मोठा गोंधळ सुरू झाला. त्यात उमेदवारांच्या पात्रता यादीत प्रथम निवास स्थान नमूद करण्यात आले आहे. जाहिरातीत 'भारतीय नागरिक किंवा सिक्कीम, भूतान, नेपाळचे नागरिक आणि दिल्लीचे रहिवासी' असे लिहिले आहे. या जाहिरातीची सिक्कीम सरकारनं गंभीर दखल घेतली असून, सिक्कीमचे मुख्य सचिव एस.सी. गुप्ता यांनी दिल्ली सरकारला पत्र लिहून तीव्र आक्षेप नोंदविला. ही 'अपमानजनक' जाहिरात त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी दिल्ली सरकारकडे केली आणि ती जनतेसाठी 'अत्यंत क्लेशकारक' असल्याचे म्हटले. दुसरीकडे सिक्कीमचे सीएम प्रेमसिंग तमांग यांनीही ट्विट करून या जाहिरातीवर कडक आक्षेप नोंदवला. त्यांनी लिहिले, 'सिक्कीम हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे. ही (जाहिरात) पूर्णपणे निंदनीय आहे आणि मी चूक सुधारण्यासाठी दिल्ली सरकारला आग्रह करतो. ' पुढील ट्वीटमध्ये ते म्हणाले, 'दिल्ली सरकारची ही जाहिरात विविध प्रिंट माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे, ज्यात सिक्कीमला भूतान आणि नेपाळसारख्या देशांसोबत वेगळे ठेवले गेले आहे. 1975पासून सिक्कीम हा भारताचा एक भाग आहे आणि आठवड्याभरापूर्वीच राज्याचा स्थापना दिवस साजरा केला गेला होता.