ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २३ - महाराष्ट्र सदनातील कॅंंटिनमध्ये पुरेशा सुविधा मिळत नसल्याने संतापलेल्या शिवसेना खासदारांनी कॅंटिनमधील मुस्लीम कर्मचा-याला बळजबरीने चपाती भरवत त्याचा रोजा मोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कॅंटिनची जबाबदारी असलेल्या आयआरसीटीसीने कॅंटिन बंद केले असून या घटनेचे पडसाद आता राज्यसभा आणि लोकसभेतही उमटले आहेत.
दिल्लीत संसदेच्या अधिवेशनासाठी जाणा-या खासदारांना गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सदनात मुक्काम करावा लागत आहे. मात्र महाराष्ट्र सदनातील कॅंटिनमध्ये खाण्यापिण्याच्या पुरेशी सुविधा नाहीत. तसेच उत्तरप्रदेशमधील खासदाराची महाराष्ट्र सदनात बडदास्त ठेवली जात असताना महाराष्ट्राच्या खासदारांकडे दुर्लक्ष होत होते. याविरोधात शिवसेनेच्या खासदारांनी नुकतेच महाराष्ट्र सदनात आंदोलनही केले होते. १७ जुलै रोजी शिवसेना खासदारांनी आपला राग कँटिनमधील एका मुस्लीम कर्मचा-यावर काढला आहे. या खासदारांनी कॅंटिनचा मॅनेजर अर्शद याला बळजबरीने चपाती भरवली. 'मी आयआरसीटीच्या गणवेषात तिथे काम करत होते. माझ्या शर्टवर माझे नाव ठळक अक्षरात लिहीलेले होते. मी रोजा ठेवलाय हे सर्वांनाच माहित असतानाही या खासदारांनी मला चपाती भरवून माझा रोझा तोडला' असे अर्शदने निवासी आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संजय राऊत (राज्यसभा), आनंदराव अडसूळ (अमरावती), राजन विचारे (ठाणे), अरविंद सावंत (दक्षिण मुंबई), हेमंत गोडसे (नाशिक), श्रीकांत शिंदे (कल्याण) यांच्यासह ११ खासदारांचा तक्रारीत समावेश आहे. शिवसेना खासदारांच्या या कृत्यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्याचे अर्शदने सांगितले.
शिवसेनेने हे आरोप फेटाळून लावले आहेत. शिवसेनेविरोधात हे षडयंत्र रचण्यात आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर कॅँटिन व सदनातील अन्य सुविधा सुमार असून याला आमचा विरोध आहेच. पण आम्ही कँटिनमधील कोणालाही धक्काबूक्की किंवा शिवीगाळ केलेली नाही असे अरविंद सावंत यांनी सांगितले. लोकसभा आणि राज्यसभेतही या घटनेचे तीव्र पडदास उमटले. यावरुन दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी शिवसेनेच्या खासदारांवर जोरदार टीका केली.