नवी दिल्ली : दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात रोजा ठेवलेल्या मुस्लीम कर्मचा:याच्या तोंडात बळजबरीने चपाती कोंबल्याप्रकरणी शिवसेनेच्या 11 खासदारांना अपात्र ठरविण्याबाबत लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना आदेश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.
याचिकाकर्ते मौलाना अन्सार रझा यांनी ही जनहित याचिका(पीआयएल)होऊ शकेल, याच्या पुष्टय़र्थ पुरेसे पुरावे सादर केलेले नाहीत, असे मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि जयंत नाथ यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले. मूळ घटनेवर गृह मंत्रलयाने चिंता व्यक्त केली असून पोलिस तपास सुरू आहे. शिवाय पीडिताने पोलिसांकडे अजूनही एफआयआर दाखल केलेला नाही, याकडे न्यायाधीशांनी लक्ष वेधले. पीडिताने पोलिसांकडे तक्रार केली नसल्यामुळे जनहित याचिका दाखल करता येत नाही, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल(एएसजी) संजय जैन यांनी स्पष्ट केले.
रेल्वे केटरिंगची व्यवस्था पाहणा:या आयआरसीटीसीकडून पुरविल्या जाणा:या निकृष्ट भोजनामुळे संतप्त होत शिवसेनेचे खा. राजन विचारे यांनी महाराष्ट्र सदनात सुपरवायझर पदावर असलेले अर्शद झुबेर यांच्या तोंडात बळजबरीने चपाती कोंबली होती. तो रमजानचा काळ असल्याने झुबेर यांनी रोजा (उपवास)ठेवला होता. या प्रकाराच्यावेळी शिवसेनेचे 11 खासदार उपस्थित होते. या सर्वाना अपात्र ठरविण्याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहातील सभापतींना आदेश द्यावे, अशी विनंती जनहित याचिकेत करण्यात आली होती.