लखनौ : उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे नुकत्याच झालेल्या दंगलीच्या चौकशीसाठी राज्य सरकारद्वारे गठित पाच सदस्यीय समितीने भाजपा खासदार राघव लखनपाल यांना जबाबदार धरले असून, स्थानिक प्रशासकीय यंत्रणेवरही बेजबाबदारपणाचा ठपका ठेवला. या खासदारानेच दंगलीसाठी चिथावणी दिली, असे अहवालात म्हटले.सहारनपूरच्या कुतुबशेर भागात गेल्या महिन्यात २६ जुलैला वादग्रस्त स्थळावरील बांधकामावरून दोन समुदायांत हिंसाचार भडकला होता़ यात ३ ठार तर २० जण जखमी झाले होते़ या दंगलीच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राज्याचे मंत्री शिवपालसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय चौकशी समिती गठित केली होती़ समितीने मुख्यमंत्र्यांकडे आपला अहवाल सोपवला. सपाचे राष्ट्रीय सरचिटणीस नरेश अग्रवाल यांनी रविवारी या अहवालातील तथ्ये उघड केली़ ही प्रशासकीय यंत्रणा आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची दंगल होती, असेही अहवालात म्हटले आहे़ याशिवाय दंगलीत येथील एका भाजपा खासदाराचीही भूमिका समोर आली. अहवालात भाजपा खासदार राघव लखनपाल यांच्यावर ठपका ठेवला आहे़ लखनपाल यांच्या चिथावणीमुळे दंगल भडकल्याचे म्हटले आहे़ विवादास्पदस्थळी लोकांना एकत्र होण्यापासूनही प्रशासकीय यंत्रणेने रोखले नाही, असे या अहवालात म्हटले आहे़ नरेश अग्रवाल यांनी या प्रकरणी दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटले भरून कारवाई करण्याची मागणी केली आहे़ भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी दोषी अधिकाऱ्यांना जरब बसणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले़
सहारणपूर दंगलीचा भाजपावर ठपका
By admin | Updated: August 18, 2014 04:46 IST