ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १२ - भारतीय हॉकीच्या इतिहासात सुवर्ण अध्याय लिहीणारे दिवंगत मेजर ध्यानचंद यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात यावा अशी शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे.
हॉकीत भारताला तब्बल तीन वेळा सुवर्णपदक मिळवून देणारे मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. गेल्यावर्षी सचिन तेंडुलकरला भारतरत्न जाहीर झाल्यावरही ध्यानचंद यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले होते. नवनियुक्त केंद्र सरकारने यंदा तब्बल पाच जणांना भारतरत्न पुरस्कार देण्याची तयारी सुरु केली असून त्यात आता मेजर ध्यानचंद यांचे नावही जोडले जाईल असे दिसते. केंद्रीय गृहमंत्रालयाने मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरन रिजीजू यांनी लोकसभेत एका प्रश्नावर उत्तर देताना ही माहिती दिली आहे.
मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय हॉकीसंघाने १९२८, १९३२ व १९३६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. ध्यानचंद यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर तब्बल २०० हून अधिक गोल केले होते. त्यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो.