प्रतिबंधात्मक कारवाईचा सभा घेऊन निषेध
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
मंचर : शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ पिंपळगाव खडकी येथे आज निषेध सभा घेण्यात आली. राज्य शासन पोलिसांमार्फत शेतकर्यांवर दडपशाही करीत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
प्रतिबंधात्मक कारवाईचा सभा घेऊन निषेध
मंचर : शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ पिंपळगाव खडकी येथे आज निषेध सभा घेण्यात आली. राज्य शासन पोलिसांमार्फत शेतकर्यांवर दडपशाही करीत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जिल्हा दौरा होता. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर, तसेच वनाजी बांगर, सोमनाथ पोखरकर या तिघांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करीत ताब्यात घेतले. त्यांना रात्रभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवून आज दुपारी एक वाजता घरी सोडण्यात आले.दरम्यान, बांगर यांना ताब्यात घेतल्याचे पडसाद त्यांच्या पिंपळगाव गावात उमटले. ग्रामस्थांनी निषेध सभा घेतली. या घटनेचा निषेध केला. सरपंच बाळासाहेब बांगर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य मधाजी पोखरकर म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मांडवगण फराटा येथील सभेत प्रभाकर बांगर व त्यांचे सहकारी यांनी शेतकर्यांच्या जीवनाशी निगडित प्रश्न मांडला होता. त्यांनी शेतकर्यांची बाजू मांडली. दूधधंदा मोडकळीस आला आहे. दुधाच्या दरात खर्च भागत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे बांगर यांनी मांडलेला मुद्दा शेतकर्यांच्या हितासाठी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बांगर यांनी शेतकर्यांचे प्रश्न पुन्हा मांडू नये. यासाठी प्रभाकर बांगर, वनाजी बांगर, सोमनाथ पोखरकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यांचा निषेध करून मधाजी पोखरकर म्हणाले, की ही लोकशाही नसून ठोकशाही आहे. राज्य सरकार एकीकडे शेतकर्यांना न्याय देत नाही व दुसरीकडे या प्रश्नाला वाचा फोडणार्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली जाते. यापुढील काळात अशी कारवाई झाली, तर आंदोलन छेडण्याचा इशारा पोखरकर यांनी दिला. नवनाथ पोखरकर, संदीप पोखरकर अरुण बांगर यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप बांगर यांनी आभार मानले. दरम्यान, महाळुंगे पडवळ, चांडोली आदी गावांत निषेधाचे फलक लावण्यात आले होते. फोटो- शेतकरी बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव खडकी येथे ग्रामस्थांनी निषेध सभा घेतली.