ऑनलाइन टीम
कोच्ची, दि. २५- केरळ येथे मुस्लीम तरुणीशी प्रेमविवाह करणा-या पादरीला त्याच्या कुटुंबाने मानसिक रुग्ण ठरवून त्याला मनोरुग्णलयात भरती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पादरीच्या प्रेयसीने रुग्णालयाबाहेर निदर्शन केल्यावर त्या पादरीला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. मात्र या प्रकराने या प्रेमी युगुलावर मानसिक आघातच झाला आहे.
केरळमधील कॅथलिक चर्चमधील २९ वर्षीय पादरी जॉन वर्गीस यांची सहा महिन्यांपूर्वी सुरुमी या मुस्लीम तरुणीशी ओळख झाली. काही दिवसांनी या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेतल्यावर वर्गीस आणि सुरुमी यांना भयावह प्रसंगांना सामोरे जावे लागले. वर्गीसच्या कुटुंबाने जॉनच्या लग्नाला विरोध दर्शवला. जॉनने लग्न न करता चर्चमध्ये पादरी म्हणून राहावे अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती. मात्र जॉनने त्यांना न जुमानता लग्नासाठी मॅरेज रजिस्ट्रारकडे रितसर अर्जही केला. याची कुणकुण लागल्यावर जॉनच्या कुटुंबाने जॉनला केरळमधील एका मनोरुग्णालयात दाखल केले. हे मनोरुग्णालय कॅथलिक नन्सच्या माध्यमातून चालवले जाते. जॉन त्याच्या अध्यात्मिक मार्गावरुन भरकटला असून त्याच्यावर मानसिक परिणाम झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयानेही कोणतीही तपासणी न करता जॉनला दाखल करुन घेत त्याच्यावर 'उपचार'ही सुरु केले.
जॉनशी संपर्क होत नसल्याने सुरुमीने त्याचा शोध घेतला व या दरम्यान तिला ही धक्कादायक माहिती समजली. अखेरीस सुरुमीने रुग्णालयाबाहेर निदर्शन केले. सुरुमीच्या विरोध प्रदर्शनामुळे रुग्णालयाने नमते घेत जॉनला रुग्णालयातून सोडले. रुग्णालयात मानसिक व शारीरिक यातनांना सामोरे जावे लागले असे जॉन सांगतो. २२ वर्षीय सुरुमीने काही महिन्यांपूर्वीच ख्रिश्चन धर्म स्वीकारला असून आता या प्रेमी युगुलाला कुटुंबासून लांब जाऊन शांततामय जीवन जगायचे आहे.