वारकरी व सरकारमुळेच पंढरपूर अस्वच्छ
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
- हायकोर्टाचा ठपका : सोमवारी सुनावणी
वारकरी व सरकारमुळेच पंढरपूर अस्वच्छ
- हायकोर्टाचा ठपका : सोमवारी सुनावणीमुंबई : पंढरपूरमध्ये येणारे वारकरी व सरकारचे ढिसाळ नियोजन यामुळे येथे घाणीचे साम्राज्य झाले असल्याचा ठपका उच्च न्यायालयाने शुक्रवारी ठेवला. यासंदर्भात ठोस उपाय योजना करण्याचे आदेश येत्या सोमवारी दिले जातील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले़महत्त्वाचे म्हणजे वारकऱ्यांवर अशाप्रकारे दोष देऊ नये, अशी विनंतीही वारकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली़ मात्र वारकरी नाहीत तर दुसरे कोण येथे येऊन घाण करतात, असा सवाल करत ही घाण होण्याला सरकारही तितकेच जबाबदार आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले़ येथे अधिकृत नोंद असलेले शेकडो मठ आहेत़ या मठांजवळ शौचालये उभी राहिली असती. मुळात वारकरी येणाऱ्या मार्गावर शौचालये व इतर पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी शासनाचीच आहे़ असे असताना शासनाने आतापर्यंत काहीच केले नाही़ त्यामुळे पंढरपूरच्या अस्वच्छतेला वारकऱ्यांसोबत शासनही तितकेच जबाबदार आहे, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले़त्याचवेळी याचिकाकर्त्यांचे वकील असिम सरोदे यांनी पंढरपूर येथे मानवी विष्ठा उचलणाऱ्यांच्या घराच्या प्रश्नाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले़ हे काम करणारे दोनशेहून कर्मचारी असून ते व त्यांचे कुटुंब अशा सुमारे दोन हजार जणांच्या निवाऱ्यावर गदा आली आहे़ कारण हे काम आता बंद करण्यात आले़ त्यामुळे त्यांना किमान कायमस्वरूपी निवारा द्यावा, अशी विनंती ॲड़ सरोदे यांनी केली़त्यावर या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी निवारा देण्याचे पंढरपूर पालिकेने मान्य केले असून पुढील निर्णय शासन दरबारी प्रलंबित असल्याचे पालिकेतर्फे न्यायालयाला सांगितले़ त्याची नोंद करून घेत न्यायालयाने याचाही खुलासा करण्याचे आदेश शासनाला दिले़ पंढरपूर येथे मानवी विष्ठा हाताने उचलली जात असून यास मनाई करावी, अशी मागणी करणारी याचिका एका सामाजिक संघटनेने दाखल केली आहे़ (प्रतिनिधी)