जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या भारतीय चौक्या आणि गावांवर तुफान गोळीबार केला, उखळी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला, तर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानासह दोघे जखमी झाले. बीएसएफने प्रत्युत्तरात केलेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.बीएसएफच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू जिल्ह्याच्या कानाचक आणि परगवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरील १२ चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी गोळीबार सुरू केला. आर.एस.पुरा सेक्टरमधील पाच चौक्या आणि सीमेवरील गावांनाही लक्ष्य करण्यात आले. परगवाल क्षेत्रातील हमीरपूर कोनामध्ये पाकिस्तानी तोफगोळा फुटल्याने संजयकुमार नामक २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या हल्ल्याने कानचक आणि परगवालच्या सीमेलगतच्या रहिवाशांत दहशत निर्माण झाली आहे. सीमापार गोळीबारात आर.एस.पुरामध्ये अर्जुन के. नावाचा बीएसएफ जवान आणि एक मुलगा जखमी झाला. दरम्यान, जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतात घुसखोरी करण्याचा दोन दहशतवाद्यांचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने मंगळवारी हाणून पाडला. आॅगस्ट महिन्याच्या चार दिवसांत पाकिस्तानी सैनिकांनी आठ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. (वृत्तसंस्था)
पाकची पुन्हा आगळीक
By admin | Updated: August 4, 2015 23:35 IST