वॉशिंग्टन : पाकिस्तानच्या खुशाब येथील जड पाणी अर्थात हेवी वॉटर असलेली चौथी अणुभट्टी आता सक्रिय झाली असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या अणुभट्टीच्या माध्यमातून पाकिस्तान प्लुटोनियमच्या लघुरूपावर आधारित अण्वस्त्रांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करू शकतो. एका अमेरिकी विचार गट अर्थात थिंक टँकने हा दावा केला आहे. पाकिस्तान सध्या ग्रेड प्लुटोनियम अस्त्रांच्या उत्पादनवाढीसाठी कार्यक्रम राबवत असून ही अणुभट्टी याचा भाग आहे. विज्ञान व आंतरराष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे डेव्हिड आॅलब्राईट व सेरेना केलेहर वजेन्तीनी यांनी सांगितले की, ‘अलीकडेच खरेदी करण्यात आलेल्या डिजिटल ग्लोब हाय रिझोल्यूशन उपग्रहाच्या १५ जानेवारी २०१५ रोजीच्या छायाचित्रावरून खुशाब येथील चौथ्या अणुभट्टीचे बाहेरील बांधकाम पूर्ण झाले असून आता ते कार्यरत झाले असल्याचे दिसते. हे विश्लेषण एका विशेष संकेतावर आधारित आहे. संयंत्राच्या शीतकरण प्रणालीतून बाष्प बाहेर पडत आहे.’छायाचित्रात नव्या युनिटच्या चिमण्यांमधून धूर येत असल्याचेही दिसते. यावरून येथे काम सुरू असल्याचे स्पष्ट होते. याशिवाय अणुभट्टीच्या परिसरात पश्चिमेकडे आणखी दोन बांधकामे सुरू आहेत. (वृत्तसंस्था)च्आॅलब्राईट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानची खुशाब अणुभट्टी राजधानी इस्लामाबादहून दक्षिणेकडे २०० किलोमीटर अंतरावर आहे. या संयंत्रात अण्वस्त्रांसाठी प्लुटोनियमचे उत्पादन होते. एका नदीकिनारी या अणुभट्टीची उभारणी करण्यात आली आहे.च्पाकिस्तान अण्वस्त्रांची निर्मिती करण्याची तयारी करत आहे. शेजारी देशांकडून कोणतीही धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास पाककडून याचा वापर केला जाऊ शकतो.च्१९९९ सालीच खुशाब अणुभट्टी उभारण्यात आली होती. तथापि, पाकिस्तानद्वारे अण्वस्त्रांची निर्मिती केली जात असल्याचे वृत्त फेटाळून लावले जाते. सुरुवातीच्या आण्विक चाचण्यानंतर आपण स्वत:हून यास प्रतिबंध घातल्याचा दावा पाकतर्फे केला जातो.