नवी दिल्ली : राजकीय पक्षांना दिलेली जमीन आणि बंगल्यांबाबतची संपूर्ण माहिती सार्वजनिक करून ती संकेतस्थळावर टाका, असे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) नगरविकास मंत्रालयास दिले आहेत़ राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) मुख्यालयाचे नाव ‘राबडी भवन’ करण्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या माहितीचा अर्ज संबंधित पक्षाकडे पाठवा, असे निर्देशही सीआयसीने दिले आहेत़माहिती आयुक्त यशोवर्धन आझाद यांनी रविवारी याबाबत माहिती दिली़ हे प्रकरण माहिती अधिकार कार्यकर्ता सुभाष अग्रवाल यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारलेल्या प्रश्नासंदर्भातील आहे़ अग्रवाल यांनी नगरविकास मंत्रालयाकडे राजद मुख्यालयाचे नाव ‘राबडी भवन’ करण्याबाबतची माहिती मागितली होती़ यावर पक्षनेते नवल किशोर रॉय यांनी आक्षेप नोंदवला होता़ अग्रवाल यांनी सर्वप्रथम राजदकडे माहिती मागितली होती़ मात्र पक्षाने माहिती नाकारल्यानंतर अग्रवाल यांनी मंत्रालयाकडे धाव घेतली होती़ कारण त्यांच्याकडेही ही माहिती होती़ बिहार सरकारकडून राजदला पाटण्यात वा अन्य राज्यात मिळालेली वा लीजवर दिलेल्या जमिनीबाबतही त्यांनी मंत्रालयाकडून माहिती मागितली होती़ यावर मंत्रालयाने राजद मुख्यालयाबाबतचे कुठलेही रेकॉर्ड आपल्याकडे नसल्याचे सांगितले होते़ तसेच राजदला दिल्लीत कुठलीही जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
राजकीय पक्षांची संपत्ती जाहीर करण्याचे आदेश
By admin | Updated: January 5, 2015 07:27 IST