शास्त्रीय संगीतासाठी एक जीवन अपूर्णच (भाग १)
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
- प्रसिद्ध संतूरवादक पं. सतीश व्यास : प्रत्येक पिढीत संगीताची अभिरुची बदलते
शास्त्रीय संगीतासाठी एक जीवन अपूर्णच (भाग १)
- प्रसिद्ध संतूरवादक पं. सतीश व्यास : प्रत्येक पिढीत संगीताची अभिरुची बदलतेनागपूर : शास्त्रीय संगीत एखाद्या महासागरासारखे आहे. जितके खोल शिरावे तितके ते खोल आहे. त्याचा तळ सापडत नाही. सापडला असे वाटत असतानाच तो अधिक खोल असल्याचे जाणवते. एक जीवन शास्त्रीय संगीत आत्मसात करण्यासाठी फारच कमी आहे. वय वाढते तसे आपण मिळविलेले ज्ञान फारच तोटके असल्याचे जाणवते. ही जाणीव झाल्यावर मात्र अद्याप शास्त्रीय संगीताच्या सागरातून आपण एक थेंबही उचलू शकलो नाही, याची अस्वस्थता येते. संगीत असेच आहे, असे मत सुप्रसिद्ध संतूरवादक पं. सतीश व्यास यांनी व्यक्त केले. पं. सतीश व्यास यांचे वडील सुप्रसिद्ध गायक पं. सी.आर. व्यास यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित संगीत महोत्सवात सादरीकरण करण्यासाठी ते नागपुरात आले असताना त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, अद्यापही मी स्वत:ला विद्यार्थीच समजतो; कारण अजूनही मला बरेच काही शिकायचे राहिले आहे. प्रत्येक पिढीत संगीताची अभिरुची काळाप्रमाणे बदलते; पण मूळ अभिजात शास्त्रीय संगीत मात्र कधीच बदलत नाही. संगीतात काळाप्रमाणे काही परिवर्तन शक्य आहे; पण त्याचे शास्त्र बदलत नाही. त्यामुळेच काळाप्रमाणे आणि रसिकांच्या अभिरुची लक्षात घेऊन गायक, कलावंतांना सादरीकरण करावे लागते. साधारण २० वर्षांपूर्वी गायक एखादा राग अनेक तास सादर करायचा. एखाद्या रागाच्या सादरीकरणावर अख्खी रात्र संपून जायची. पण सध्याच्या काळात हा संयम आणि वेळ कुणाकडेच नाही. त्यामुळेच रसिकांच्या वेळ आणि अभिरुचीप्रमाणे सादरीकरण होते. पण शास्त्रीय गायन, वादन सादर करणारे कलावंत कमी वेळात रागाची ठेवण शास्त्रनियमांच्या चाकोरीत सादर करतात. त्यामुळे मूळ संगीताला धक्का बसत नाही. वेळेअभावी एखादा राग साधारण पाऊण तास वाजवावा लागतो.