रायपूर : माओवाद्यांचे प्राबल्य कमी करण्याच्या उद्देशाने छत्तीसगढच्या बस्तर भागांत २४ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी सुकमा जिल्ह्यात २५० हून अधिक गावकऱ्यांचे अपहरण केले असतानाच दुसरीकडे मोदी यांनी माओवाद्यांंना शस्त्रे खाली ठेवून हाती नांगर धरण्याचे आवाहन केले. दरम्यान, शनिवारी रात्री माओवाद्यांनी एका गावकऱ्याची हत्या करून सर्व गावकऱ्यांची मुक्तता केली.मोदींचे कार्यक्रम दांतेवाडा जिल्ह्णात झाले तर त्या शेजारच्या सुकमा जिल्ह्णाच्या मोरेंगा गावातून माओवाद्यांनी गावकऱ्यांचे अपहरण केले. सर्वत्र या घटनेने खळबळ उडाली असतानाच शनिवारी रात्री माओवाद्यांनी एकाची हत्या करून उर्वरित गावकऱ्यांची मुक्तता केली. रात्री उशिरापर्यंत गावकरी आपापल्या घरी परतत होते. माओवाद्यांनी हत्या केलेल्याचा मृतदेह घेऊन नागरिक परतत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. दांतेवाडा जिल्ह्णात माओवाद्यांनी दोन दिवसांचा बंद पुकारून मोदींच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. एका पुलाचे काम करणाऱ्या गावातील मजुरांना माओवादी धमकावून आपल्यासोबत घेऊन गेले, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र त्यांची संख्या किती याविषयी उलटसुलट माहिती मिळाली. अपहरण केलेल्यांमध्ये कोणीही महिला, मुले वा वृद्ध व्यक्ती नसल्याचे सरकारी प्रवक्ते जी. एस. मिश्रा यांनी सांगितले. सुकमाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरीश राठोड यांनी सुरुवातीस पुलाच्या बांधकामास विरोध करणाऱ्या माओवाद्यांनी ४०० ते ५०० लोकांना आपल्यासोबत जंगलात नेल्याचे सांगितले. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक डी. श्रावण म्हणाले की, माओवाद्यांनी या लोकांना ओलीस ठेवले आहे, असे नाही कारण त्यांनी कोणत्याही खंडणीची मागणी केलेली नाही. तसेच पंतप्रधानांच्या दौऱ्याशीही याचा काही संबंध नाही. गावातील आपले वर्चस्व दाखविण्यासाठी माओवादी असे करत असतात. लवकरच त्यांना सोडून दिले जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. (वृत्तसंस्था)
माओवाद्यांकडून एकाची हत्या; २५० जणांची सुटका
By admin | Updated: May 10, 2015 03:53 IST