ओडिशाचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले
By admin | Updated: June 3, 2014 00:59 IST
नवी दिल्ली : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा आणि अन्य सहाय्य देण्याची मागणी केली. तथापि, रालोआत सामील होण्याच्या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.
ओडिशाचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले
नवी दिल्ली : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा आणि अन्य सहाय्य देण्याची मागणी केली. तथापि, रालोआत सामील होण्याच्या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजदच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने मोदींना भेटून राज्यातील समस्यांबाबत अर्धा तास चर्चा केली. मोदींना भेटल्यानंतर पटनायक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आपल्या मागण्यांप्रति मोदींची भूमिका अतिशय सकारात्मक होती. रालोआ सरकार ओडिशाला यापूर्वीच्या संपुआ सरकारपेक्षा निश्चितच चांगली वागणूक देईल, अशी आशा आहे. आम्ही सकारात्मक भूमिका बजावणार. ओडिशाच्या उचित मागण्यांवर रालोआ सरकारदेखील अनुकूल भूमिका घेईल, अशी आशा आहे.रेल्वे अर्थसंकल्पात ओडिशासाठी ३,१६० कोटींची तरतूद करण्याची मागणी पटनायक यांनी मोदींकडे केली.बिजद रालोआत सामील होणार काय आणि रालोआ अल्पमतात असलेल्या राज्यसभेत बिजदची कोणती भूमिका असेल, असा प्रश्न पत्रकारांनी पटनायक यांना विचारला होता. बिजदचे राज्यसभेत चार आणि लोकसभेत २० खासदार आहेत. चौथ्यांदा ओडिशाचे मुख्यमंत्री बनलेले पटनायक यांनी आपल्या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी मोदींकडे केली; सोबतच पोलावरम प्रकल्प रद्द करण्याचीही मागणी त्यांनी पुढे रेटली. या प्रकल्पामुळे ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील १३० गावे आणि लाखो हेक्टर शेतजमीन जलमय होण्याचा धोका आहे.बिजद रालोआत सामील होणार काय, या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे पटनायक यांनी टाळले. याबाबत अद्याप विचार केलेला नाही आणि मोदींसोबतच्या चर्चेतही हा मुद्दा आला नाही. आम्ही रचनात्मक भूमिका बजावणार, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)