हरीश गुप्ता, नवी दिल्लीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या महिन्यातील आपली भारत भेट फक्त दोन दिवसांपुरती मर्यादित ठेवल्याने हा दौरा ऐतिहासिक ठरावा यासाठी त्याच्या तयारीच्या तपशिलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीने लक्ष ठेवून आहेत. मोदींच्या अमेरिका भेटीनंतर अवघ्या चार महिन्यांत ओबामा यांनी भारताला भेट द्यावी ही विशेष बाब मानली जात असून भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ््याचे विशेष अतिथी म्हणून हजर राहणारे ते पहिलेच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष असल्याने यास भारत-अमेरिका संबंधांतील नवा अध्याय म्हणून पाहिले जात आहे.सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओबामा २५ जानेवारी रोजी दिल्लीत येतील. २६ जानेवारीस सकाळी राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलानास व सायंकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ‘अॅट होम’ कार्यक्रमास हजर राहून त्याच दिवशी रात्री ते रवाना होतील. आधी ओबामांची ही भेट तीन दिवसांची असेल अशी अटकळ होती. पण आता दोनच दिवसांचा दौरा असल्याने त्यासाठी भरगच्च कार्यक्रम आखण्यात येत असल्याचे कळते. ओबामा एकटेच येतील की त्यांच्यासोबत पत्नी व दोन मुलीही असतील याची नक्की माहिती अद्याप मिलालेली नाही.ओबामांची ही भेट छोटेखानी असली तरी त्यातून उभय देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधांना भरीव पाठबळ मिळावे यासाठी मोदी उत्सूक असल्याचे समजते. ओबामा व मोदी यांच्यात अल्पावधीत व्यक्तिगतरीत्या तयार झालेल्या मनोमिलनाने पट्टीच्या राजनैतिक मुत्सद्यांनाही चकित केले होते. त्यामुळे या भेटीत अक्षय ऊर्जा, संरक्षण,वैज्ञानिक संशोधन आणि शिक्षण यासह अनेक क्षेत्रातील सहकार्याचे ठोस करार या दोन दिवसांत होतील, अशी अपेक्षा आहे. गेली १० वर्षे अस्तित्वात असलेल्या संरक्षणविषयक सहकार्याच्या कराराचे आणखी कालासाठी नूतनीकरण केले जाईल हेही नक्की मानले जात आहे.
ओबामा भेटीकडे मोदींचे लक्ष
By admin | Updated: January 5, 2015 07:27 IST