ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. १९ - घरात शौचालय नाही म्हणून सहा नववधूंनी सासर सोडल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.
देशातील महिलांना उघड्यावर शौचाला जावे लागते ही लज्जास्पद बाब असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या प्रमाणावर शौचालयं उभे करण्याचे आव्हान स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान केले होते. त्यापासून प्रेरणा घेतच या सहा जणींनी हा निर्णय घेतला.
खुशीनगर जिल्ह्यातील खेसिया गावात राहणा-या नीलिमा, कलावती, शकिना, निरंजन, गुडिया आणि सीता अशी या सहा महिलांची नावे असून आपल्या सासरी घरात शौचालय नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या पती व सासू- सास-यांकडे याची तक्रार केली आणि लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच त्या माहेरी परतल्या.
अत्यल्प दरात स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणा-या 'सुलभ इंटरनॅशनल' या एनजीओने या नववधूंसाठी मोफत शौचालये बांधून देण्याची घोषणा केली आहे.
यापूर्वीही असाच एक प्रसंग घडला आहे. महाराजगंज येथे राहणा-या प्रियांका भारती या नवविवाहितेनेही असेच पाऊल उचलले होते व त्यासाठी तिचा सत्कारही करण्यात आला होता.