प्रश्न : मोदी सरकारच्या पहिल्या वर्षाच्या कारभाराचे मूल्यमापन आपण कसे कराल?- या सरकारने दिलेली आश्वासने व प्रत्यक्षात केलेले काम यात खूपच मोठी तफावत आहे. सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच वर्षात जनतेला एवढे अप्रिय झालेले (अन्य) सरकार मी तरी पाहिलेले नाही. दुर्दैव असे की, पंतप्रधान आमचे ऐकतही नाहीत.प्रश्न : बस्स इतकेच?- सगळ्याची ही गोळाबेरीज आहे... इतरही अनेक गोष्टी आहेत.प्रश्न : त्या कोणत्या?- ‘घरवापसी’, ‘लव्ह जिहाद’ यासारख्या समाजाचे ध्रुवीकरण करणाऱ्या मोहिमा राबवून भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकास आपल्या कल्पनेतील ‘हिंदू राष्ट्रा’चे स्वरूप देण्याच्या कारवाया राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे आणि मोदी सरकार त्यास साथ देत आहे... इतिहास आणि पौराणिक संदर्भ बदलण्याचे त्यांचे उद्योग आपण पाहतच आहोत. त्यांचे मंत्री सांप्रदायिक भाषणे करीत आहेत.प्रश्न : पण ते तर केवळ एकच कनिष्ठ मंत्री होते व त्यांनीही माफी मागितली!- हो, पण त्यानंतरही सांप्रदायिक गरळ ओकणे सुरूच आहे.प्रश्न : पंतप्रधानांनी स्वत:ची भूमिका स्पष्ट केली. भाजपानेही खुलासा केला.- ते खरे नाही. इतरही अनेक मंत्री, त्यांच्या पक्षाच्या खासदारांचे त्याच भाषेत बोलणे अद्यापही सुरूच आहे.प्रश्न : त्यांना लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे आपला अजेंडा राबविण्याचा त्यांना हक्क आहे. त्यात गैर काय?- पण त्यांनी अशा सांप्रदायिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्यावर निवडणूक लढविली नव्हती. त्यांनी लोकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून मते घेतली.प्रश्न : म्हणजे, मोदींनी केवळ विकासाची भाषा केली तर ते तुम्हाला पसंत आहेत?- नाही. ते तसे करणार नाहीत, करूही शकणार नाहीत. मला एवढेच म्हणायचे आहे की ते स्वत:च दिलेली आश्वासने पाळत नाहीयेत... ते छुपेपणाने त्यांचा ‘खरा’ अजेंडा राबवीत आहेत.प्रश्न : काँग्रेसने करून ठेवलेला गोंधळ आपण निस्तरतोय, असे त्यांचे म्हणणे आहे.- ते कोणत्या गोंधळाविषयी बोलताहेत, ते मला माहीत नाही. खरेच पूर्वसुरींनी गोंधळ केला असेल तर तो निस्तरण्याचा प्रश्न येतो. पंतप्रधान होण्याआधी याची त्यांना कल्पना नव्हती का? नाही, ते गोंधळ निस्तरण्याऐवजी आधी होता त्याहूनही मोठा गोंधळ घालत आहेत.प्रश्न : आपण भारत घोटाळेमुक्त करीत आहोत, असे ते म्हणतात.- हं, घोटाळेमुक्त? हे सर्व घोटाळे केव्हा बरं उघड झाले? संपुआ सरकारची सात वर्षे पूर्ण झाल्यावर एकेक घोटाळा बाहेर येऊ लागला. मोदींचे तर हे पहिलेच वर्ष आहे. जरा धीर धरा आणि नंतर पाहा.प्रश्न : म्हणजे, हे सरकारही घोटाळेबाज आहे व त्यांचे घोटाळेही उघड होतील, असे तुम्हाला म्हणायचे आहे?- कोणताही घोटाळा उघड व्हायला वेळ हा लागतोच.प्रश्न : मोदींच्या विरोधात अजून तरी कोणताही नेमका घोटाळा तुमच्या हाती लागलेला नाही.- हो (तूर्तास तरी) ते खरे आहे. (पण) कोणताही घोटाळा उघड व्हायला एक वर्ष हा खूपच कमी काळ आहे. प्रश्न : मग, दिलेली आश्वासने पूर्ण न करणे आणि सांप्रदायिक अॅजेंडा राबविणे याखेरीज तुमचा मोदींवर आणखी नेमका आरोप काय?- हे आरोपच खूप गंभीर आहेत. लोकांनी ‘अच्छे दिन’साठी मते दिली. मोदींनी जनतेचा विश्वासघात केला आहे.प्रश्न : पण या सरकारला जेमतेम एक वर्ष होतेय. यावर तुमचे म्हणणे काय?- संधी मिळेल तेव्हा लोक याचे उत्तर नक्कीच देतील. पाठोपाठच्या निवडणुकांमध्ये हे दिसूही लागले आहे. भाजपाचा मतांचा टक्का घसरतोय. लोकसभा निवडणुकीतही भाजपाला जेमतेम ३१ टक्के मते मिळाली होती.प्रश्न : म्हणजे राहिलेल्या ६९ टक्के मतांची तुम्हाला जुळवाजुळव करायची आहे तर?- होय. आम्ही ते करू आणि त्यासाठी आमचे प्रयत्नही सुरू आहेत. मी एवढे सांगू शकतो की त्यांना (भाजपा) आहेत ती ३१ टक्के मते कायम राखणेही शक्य होणार नाही.प्रश्न: त्यासाठी तुमचे काय प्रयत्न आहेत?- सर्वप्रथम स्वत:ला बळकट करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत. २००९पासून आमच्या जनाधाराला सतत ओहोटी लागत गेली.प्रश्न : (पुन्हा) कोणतीही घोडचूक न करण्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल.- कसली घोडचूक?प्रश्न : १९९६मधील सुरजीत यांच्या कारकिर्दीतील चूक... त्या वेळी तुम्ही ज्योती बसुंना पंतप्रधान होऊ दिले नव्हते.- नाही. ती चूक होती, असे आम्हाला वाटत नाही. त्या वेळी ज्योती बसुंनी पंतप्रधान होऊ नये, असा आमच्या पक्षाच्या काँग्रेसने निर्णय घेतला होता.प्रश्न : पण ते सर्व नंतर झालं.- काही झाले तरी, ते ज्योती बसुंचे मत होते, पक्षाचे नव्हे.प्रश्न : २००८मध्ये तुम्ही काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेतलात, त्या घोडचुकीचे काय?- ती मुळीच घोडचूक नव्हती. काँग्रेसच्या उर्मटपणाची ती फलश्रुती होती. त्या वेळी सत्ता काँग्रेसच्या डोक्यात गेली होती.प्रश्न : पण मग तुमच्या पुढचे आव्हान कोणते? मोदींचा सामना तुम्ही कसा करणार?- हे पाहा, आमच्या पक्षाचा जनाधार २००९पासून हळूहळू कमी होत गेलाय..प्रश्न : म्हणजे तुमचे लक्ष्य नवी डावी चळवळ, नवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे आहे?- नाही, नाही. ते सर्व तुमच्या डोक्यात आहे, माझ्या नाही.प्रश्न : मग तुमचा परवलीचा शब्द कोणता?- परवलीच्या शब्दाची गरजही नाही. राजकारण हा काय काही विकण्याचा आणि खोटी आश्वासने देण्याचा धंदा नव्हे.. मला जे म्हणायचे आहे त्याचे प्रत्यंतर तुम्हाला लवकरच येईल. तुम्ही लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही.प्रश्न : मग, मोदी कुचकामी आहेत, असे तुम्हाला म्हणायचे आहे?- मला एवढेच म्हणायचे आहे की, दिलेली आश्वासने ते पूण करीत नाहीयेत.प्रश्न : पण तुमच्यापुढे तर दुहेरी आव्हान आहे.. दिल्लीत मोदी व बंगालमध्ये ममता.- होय, ती तर आधीपासूनचीच आहेत. ममतांचा केवळ राजकीय पक्ष नाही. त्यांचे राजकारण हिंसाचाराचे, धाकदपटशाहीचे आहे.प्रश्न : आणि आता तर अरविंद केजरीवाल हा नवा तारा उदयाला आलाय.- अरविंद केजरीवाल यांच्या विजयाचे आम्ही स्वागत केले, दिल्ली निवडणुकीत आम्ही त्यांच्यासाठी मतदान केले... एरवी आम्ही जे मुद्दे घेतो त्यापैकी बरेच त्यांनीही घेतले, पण ते त्यांनी अधिक परिणामकारकपणे लोकांपर्यंत नेले.प्रश्न : आता मोदी, ममता व ‘आप’ अशी राजकारणाची मॉडेल तयार झाली आहेत. मग तुमचे मॉडेल कोणते?- तुमचे हे मॉडेलचे राजकारण मला मान्य नाही... ते आपापले राजकारण करताहेत.प्रश्न : ठीक आहे. मग येचुरींच्या राजकारणाचे मॉडेल कोणते?- ते तुम्हाला प्रत्यक्ष कृतीतूनच दिसेल.प्रश्न : पक्षात नवचैतन्य आणण्याची तुमची योजना काय?- आमची योजना अगदी साधी आहे. तुम्हाला मॉडेलच्याच भाषेत बोलायचे असेल तर.. लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी काम करणे हे आमचे मॉडेल आहे. देशातील शेती गंभीर संकटात आहे. कारखानदारीही अडचणीत आहे. जो तो नाखूश दिसतो आहे. लोकांचे प्रश्न हाती घेऊन पुढे जाण्याची आमची योजना आहे.प्रश्न : काँग्रेससोबत पुन्हा मुद्द्यांवर आधारित सहकार्याची तुमची भूमिका आहे?- होय. संसदेत आणि संसदेबाहेरही आमचे तसे धोरण असणार आहे.प्रश्न : संसदेच्या बाहेरही?-भूसंपादन कायद्यासारख्या मुद्द्यांवर..प्रश्न : पण काँग्रेस नीटपणे वागतेय, असे वाटते?- त्यांच्यापुढेही स्वत:चे असे मोठे काम आहे.प्रश्न : पण. तुमचे काँग्रेसेतर, भाजपातर प्रयोग नेहमीच अपयशी ठरत आले आहेत...- ते बदलणे, हेच आमचे लक्ष्य असेल.प्रश्न : मार्क्सवादी पक्षाचे सरचिटणीस या नात्याने करायलाच हवे असे तुमच्या डोळ्यांपुढील काम कोणते?- जनाधाराच्या घसरणीला आवर घालणे हे तातडीचे काम असेल. त्यानंतर पुन्हा पूर्वस्थितीत येऊन त्यात वाढ करण्याचे.प्रश्न : पण, हे करणार कसे?- त्याला याआधीच सुरुवात झाली आहे. २००९नंतर प्रथमच, बंगालमध्ये झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये १ टक्क्याने का होईना पण आमची मते वाढली आहेत....
नरेंद्र मोदींनी जनतेचा विश्वासघात केला!
By admin | Updated: May 10, 2015 04:05 IST