नवी दिल्ली : विरोधी ऐक्याचे दर्शन घडवत एकत्र आलेले जनता दलाचे सहा जुने सहकारी सोमवारी सरकारविरोधी धरणे आंदोलनाच्या निमित्ताने एका मंचावर ‘शक्तिप्रदर्शन’ करताना दिसले़ यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला़समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव, राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव आणि जनता दल (युनायटेड)चे नितीश कुमार आदी नेत्यांनी आपले ‘पूर्वग्रह’ दूर सारून भाजपाला बाहेरचा रस्ता दाखविण्याचे तसेच एक नवी गाथा लिहिण्याची ग्वाही यावेळी दिली़ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारिक अन्वर आणि डी़पी़ त्रिपाठी यांनीही मंचावर हजेरी लावली़ तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पक्षनेते डेरेक ओ ब्रायन यांच्या माध्यमातून आपले पाठिंबा पत्र पाठवत, आपले समर्थन जाहीर केले़जनता दल सेक्युलर अर्थात जेडी(एस)चे नेते व माजी पंतप्रधान एच़डी देवेगौडा, इंडियन नॅशनल लोकदलाचे दुष्यंत चौटाला, समाजवादी जनता पार्टीचे कमल मोरारका आदींनी या धरणे कार्यक्रमात सहभाग घेतला.महाआघाडी उभारण्याच्या दिशेने या महाधरणे कार्यक्रमाकडे बघितले जात असतानाच, जनता परिवाराने भूतकाळात तीन आघाडी सरकारे स्थापन केल्याचे स्मरणही मंचावरील नेत्यांनी करून दिले़ मोदींनी निवडणूकपूर्व काळात अनेक आश्वासने दिली़ काळा पैसा परत आणू़, प्रत्येकाला १५ लाख देऊ़ आता ही आश्वासने कुठे गेलीत, असा सवाल यावेळी या नेत्यांनी केला़(लोकमत न्यूज नेटवर्क)
मुलायम, लालूप्रसाद, देवेगौडा, नितीशकुमार एकाच मंचावर
By admin | Updated: December 23, 2014 00:42 IST