ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १३ - केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारकडे देश चालवण्यासाठी कोणतेही नवे धोरण नसून त्यांनी यूपीए सरकारचेच धोरण चोरुन पुढे नेले आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. मात्र काँग्रेस भाजपच्या या कृतीचे स्वागत करत आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
काँग्रेसच्या संसदीय दलाची बुधवारी दिल्लीत बैठक झाली.या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप सरकारकडे कोणतीही नवे धोरण नाही. ते यूपीए सरकारचेच धोरण पुढे नेत आहेत ज्याचा त्यांनी कधीकाळी कडाडून विरोध दर्शवला होता अशी आठवण सोनिया गांधींनी करुन दिली. सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पातही नवीन काहीच नाही असे त्यांनी नमूद केले.
काँग्रेसच्या पराभवाविषयी सोनिया गांधी म्हणाल्या, लोकसभेत काँग्रेसचे संख्याबळ कमी असले तरी पक्षाच्या संकल्पात कोणतीही कमी यायला नको. जनतेचा विश्वास परत मिळवण्यासाठी पक्ष कामाला लागले असून काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळात पक्षाला भक्कम करण्यासाठी काम करावे असे त्यांनी सांगितले.