ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १६ - देशभरात आतापर्यंत हाती आलेल्या लोकसभा निकालांमध्ये आणि ट्रेंड्समध्ये भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी (एनडीए) 543 पैकी 326 जागांवर विजय नोंदवला आहे किंवा आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी लागणारा २७२ चा आकडा त्यांनी केव्हाच ओलांडला आहे. एनडीएच्या एकूण जागांपैकी बहुसंख्य म्हणजे २७७ जागा एकट्या भाजपाच्या आहेत. त्यामुळे त्यांना मित्रपक्षांच्या सहकार्याची फारशी गरज पडणार नाही हेही दिसत आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने घवघवीत यश मिळवले आहे. पण ममता बॅनर्जींच्या या खासदारांची आता मोदींना गरज नाही. ते स्वबळावर सरकार स्थान करू शकतील अशी परिस्थिती आहे. ममता बॅनर्जी मोदींना पाठिंबा देणार की नाही या मुद्दा आता गौण आहे. याबरोबरच त्यांच्या अन्य मित्रपक्षांचीही स्थिती आहे. त्यात आंध्र प्रदेशमधील तेलगू देसम पार्टी, बिहारमधील एलजेपी, महाराष्ट्रात शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचीही तिच अवस्था आहे.
जयललिता मोदींना पाठिंबा देतील का असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात येत होता. परंतु तामिळनाडूमध्ये तब्बल ३३ जागांवर विजय मिळवणा-या जयललितांच्या एआयडीएमकेच्या पाठिंब्याचीही भाजपाप्रणीत एनडीएला गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे.