एचपी कंपनीला ग्राहक मंचचा दणका ग्राहकाला दिला सदोष लॅपटॉप: नुकसानभरपाईपोटी सव्वा तीन लाख रुपये देण्याचे आदेश
By admin | Updated: September 2, 2015 23:31 IST
नवी मुंबई : नेरूळ येथील एका ग्राहकाला सदोष लॅपटॉप दिल्याप्रकरणी नवी मुंबई ग्राहक न्यायालयाने एचपी कंपनीला दणका दिला आहे. याप्रकरणी एचपी कंपनीने संबंधित ग्राहकाला नुकसानभरपाई म्हणून लॅपटॉपची किंमत, न्यायालयीन खर्च व लॅपटॉपमधील डाटा गहाळ झाल्याप्रकरणी एकूण सव्वा तीन लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
एचपी कंपनीला ग्राहक मंचचा दणका ग्राहकाला दिला सदोष लॅपटॉप: नुकसानभरपाईपोटी सव्वा तीन लाख रुपये देण्याचे आदेश
नवी मुंबई : नेरूळ येथील एका ग्राहकाला सदोष लॅपटॉप दिल्याप्रकरणी नवी मुंबई ग्राहक न्यायालयाने एचपी कंपनीला दणका दिला आहे. याप्रकरणी एचपी कंपनीने संबंधित ग्राहकाला नुकसानभरपाई म्हणून लॅपटॉपची किंमत, न्यायालयीन खर्च व लॅपटॉपमधील डाटा गहाळ झाल्याप्रकरणी एकूण सव्वा तीन लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील तक्रारदार विशाल भालोदिया यांनी नोव्हेंबर २००७ मध्ये एचपी कंपनीचा ३० हजार रुपयांमध्ये लॅपटॉप तीन वर्षांच्या वॉरंटीसह खरेदी केला होता. एप्रिल २०१० मध्ये विशाल आपल्या कंपनीच्या कामानिमित्त चंदिगड येथे गेले होते. तेथे आपल्या लॅपटॉपमधून उपस्थित ६० अधिकार्यांना प्रेझेन्टेशन दाखवित असताना अचानक लॅपटॉपमधून धूर येऊ लागला. त्यामुळे त्यांनी लॅपटॉप बाजूला टाकून दिला असता त्यात तीन स्फोट होवून आग लागली. विशाल यांनी या सर्व घटनेचे आपल्या मोबाइलद्वारे चित्रीकरण करून त्याची सीडी तयार केली होती. त्यानंतर त्याने एचपी कंपनीकडे ही सीडी पाठवून सदोष लॅपटॉपबाबत तक्रार केली होती. सुरुवातीला कंपनीने विशालच्या तक्रारीची दखल घेत तपासणीनंतर तो सदोष असल्याचे मान्य करून त्यांना मे २०१० मध्ये दुसरा लॅपटॉप दिला होता. परंतु लॅपटॉपमध्ये संकलित केलेली महत्त्वाची माहिती व इतर महत्त्वाचा डाटा नष्ट झाल्याचे सांगून त्यांनी कंपनीकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. मात्र कंपनीकडून त्यांच्या मागणीला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी कोकणभवन नवी मुंबई येथील ठाणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली होती. मंचाच्या अध्यक्षा स्नेहा म्हात्रे व सदस्य त्र्यंबक थुल यांच्या खंडपीठाने ही तक्रार निकाली काढताना एचपी कंपनीने विशाल यांना सदोष लॅपटॉप दिल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे तक्रारदार विशाल भालोदिया याला लॅपटॉपच्या स्फोटामुळे झालेल्या नुकसानापोटी अडीच लाख रुपये तसेच या सर्व प्रकारामुळे त्यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी ५० हजार रुपये, त्याचप्रमाणे न्यायिक खर्चापोटी २५ हजार रुपये अशी एकूण सव्वा तीन लाख रुपयांची रक्कम भरपाई म्हणून देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत. सदरची नुकसानभरपाई कंपनीने दोन महिन्यांच्या आत तक्रारदाराला देण्याबाबत आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)