कोकणसाठीही हवे पॅकेज!
By admin | Updated: December 21, 2014 23:49 IST
- सर्वपक्षीय आमदार एकवटले : मुख्यमंत्र्यांना भेटणार
कोकणसाठीही हवे पॅकेज!
- सर्वपक्षीय आमदार एकवटले : मुख्यमंत्र्यांना भेटणारनागपूर : विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळी शेतकर्यांना मदतीचे पॅकेज जाहीर झाल्यानंतर आता कोकणातील शेतकर्यांच्या समस्यांसह विकासाचे विविध प्रश्न सरकारकडून सोडवून घेण्यासाठी कोकणातील सर्वपक्षीय आमदार एकवटले आहेत. कोकणातही मोठ्या प्रमाणात अनुशेष आहे, पर्यटनाचे नंदनवन असलेले कोकण विकासात मागे पडत चालले आहे आदी प्रश्नांबाबत संबंधित आमदार दबाव गट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोकण विकासासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी करणार आहेत.अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात दुष्काळावरील चर्चेनंतर फडणवीस यांनी विधानसभेत सात हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्यानंतर पंडितशेठ पाटील यांच्या नेतृत्त्वात धैर्यशील पाटील, शिवसेनेचे वैभव नाईक, मनोहर भोईर, भरतशेठ गोगावले, भाजपाचे प्रशांत ठाकूर यांनी लॉबीमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेत कोकणलाही भरीव मदत करण्याची आग्रही मागणी केली होती. फडणवीस यांनी या आमदारांना सकारात्मक उत्तरही दिले होते. मात्र, त्यानंतर दुसर्या आठवड्यातही कोकणाला काहीच मिळाले नाही, असा या आमदारांचा आक्षेप असून त्यामुळेच त्यांनी विकासाच्या मुद्यावर एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनी यात पुढाकार घेतला आहे.-------------कोकणच्या आमदार निधीत कपात कशासाठी?दुष्काळ, अतिवृष्टी गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीसाठी मदतनिधी देण्यासाठी ७०० कोटी रुपये उभारण्यासाठी आमदार निधीत कपात करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. कोकणातील आमदारांनी यावर आक्षेप घेतला आहे.